गोराई परिसरात ‘व्ही’ अक्षरावरून नाव असलेल्या एका सोसायटीत गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधी येत आहे, असा निनावी दूरध्वनी बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गुणाजी सावंत यांना आला आणि सुरू झाला या सोसायटीचा शोध. दूरध्वनी करणाऱ्याने सोसायटीचे नाव न सांगण्यामागील गौडबंगाल पोलिसांना उलगडले नाही. पण नक्कीच काहीतरी गडबड आहे, हे ओळखून त्यांनी गांभीर्याने तपास सुरू केला.

‘व्ही’ अक्षरावरून नाव असलेल्या सोसायटीचा शोध घेत पोलिसांचे पथक अखेर गोराईच्या दोन क्रमांकाच्या विभागातील प्लॉट क्रमांक २२ वर असलेल्या विशाल सोसायटीजवळ पोहोचले. उंदीर मेल्यासारखी दुर्गंधी नेमकी कोठून येत आहे, याचा शोध घेत एका खोलीजवळ पोलीस पोहोचले. बैठे घर होते ते. पोलिसांनी छतावरून अंदाज घेतला आणि दुर्गंधी याच खोलीतून येतेय, हे स्पष्ट झाले. दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला. आत तपासणी केली असता पलंगाखाली एका गादीमध्ये गुंडाळून ठेवण्यात आलेला एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळला. हा मृतदेह ७५ वर्षे वयाच्या भीमा वडेरिया यांचा होता. ते एकटेच राहात होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असता गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.

ज्या रीतीने मृतदेह आढळला होता ते पाहता चोरीच्या हेतूने हत्या झाल्याची अजिबात शक्यता नव्हती. घरातील वस्तू जागेवर होत्या तसेच घर आतून बंद होते. याचा अर्थ अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचे स्पष्ट असल्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवून बोरिवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) घोसाळकर, सहायक निरीक्षक विशाल गायकवाड, शिंदे आदींनी तपास सुरू केला.

शेजाऱ्यांकडे विचारपूस करण्यात आली तेव्हा आठ-नऊ  दिवसांपूर्वी एक रिक्षावाला त्यांना भेटण्यासाठी आला होता, अशी माहिती मिळाली. त्या रिक्षावाल्याला यापूर्वी कोणीही पाहिलेले नव्हते. त्यांचा पुरुषोत्तम नावाचा मुलगाही त्या काळात दोन-तीन वेळा आला होता, अशीही माहिती पोलिसांना मिळाली. पुरुषोत्तम येऊन शिवीगाळ करायचा आणि काही वेळा त्यांना मारहाणही करीत असे, असेही पोलिसांना चौकशीत आढळले. त्यामुळे पुरुषोत्तमचा या हत्येशी संबंध असावा, असे पोलिसांना वाटत होते. त्याच्याकडेही चौकशी करण्यात आली. आपण तेथे गेलो होतो हे त्याने मान्य केले. परंतु हत्येशी आपला काहीही संबंध नाही, असे तो सांगू लागला. हातात काहीही पुरावा नसल्यामुळे पोलीस गप्प होते. साधारणत: ज्या काळात हत्या करण्यात आली त्या काळातील पुरुषोत्तमच्या मोबाइलचे लोकेशनही तेथेच आढळून येत होते. त्यामुळेच सुरुवातीला पोलिसांना त्याच्यावरच संशय होता. तोपर्यंत पोलिसांनी रिक्षावाल्याची माहिती काढली होती. दीपक बाबर असे त्याचे नाव. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी हिसका दाखविल्यानंतर या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यास पोलिसांना वेळ लागला नाही. बाबरने घटनाक्रमच उघड केला. त्याने दिलेल्या माहितीवरून मग पुरुषोत्तमलाही अटक करण्यात आली. बाबर पोलिसांच्या ताब्यात असल्याचे पाहिल्यानंतर कबुली द्यायला पुरुषोत्तमला वेळ लागला नाही.

पुरुषोत्तम बेरोजगार होता. वडिलांनी १६ वर्षांपूर्वी आपल्या आईला घराबाहेर काढल्याचा राग त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. आईदेखील वडिलांच्या विरोधात सतत सांगत असे. त्यामुळे तो जेव्हा वडिलांना भेटण्यासाठी जायचा तेव्हा त्यांच्याशी भांडण करायचा, त्यांना मारहाण करायचा. घर नावावर करण्यासाठी त्यांच्यामागे सतत तगादा लावत असे. परंतु भीमा त्यांना दाद देत नसत. आठ-दहा दिवसांपूर्वी सुरुवातीला पुरुषोत्तमचा लहान भाऊ  वडिलांकडे गेला आणि त्याने घर नावावर करण्याची मागणी केली. परंतु भीमा यांनी त्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशी पुरुषोत्तम गेला. तेव्हाही घर नावावर करण्याचाच तगादा त्याने लावला. परंतु त्यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर बाबरला घेऊन तो पुन्हा गेला. यावेळी झालेल्या बाचाबाचीत पुरुषोत्तम आणि बाबरने भीमाच्या डोक्यावर लाकडाने जोरदार प्रहार केला. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत सोडून ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा आले तेव्हा रक्तस्राव होऊन वडिलांचा मृत्यू झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्याचा प्रयत्न होता. परंतु माघी गणेशोत्सव असल्यामुळे सोसायटीत उत्सवी माहौल होता. परिणामी त्यांचा हेतू सफल होऊ  शकला नाही. पुन्हा ते दोन-तीन दिवसांनी आले. परंतु तोपर्यंत मृतदेहापासून दुर्गंधी येऊ लागली होती. त्यामुळे गादीमध्ये मृतदेह गुंडाळून ते निघून गेले. दुर्गंधी वाढू लागली तशी कोणीतरी पोलिसांना हे कळवले आणि या हत्येचा उलगडा झाला.

आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला बाहेर काढल्यामुळे आपला वडिलांवर राग होताच. त्यातच घरही वडील नावावर करीत नव्हते. त्यांना मारण्याचा आपला इरादा नव्हता, असेही पुरुषोत्तम सांगत होता. परंतु पोलिसांनी याबाबत खोलात तपास केला तेव्हा पुरुषोत्तमच्या आईचे रिक्षावाल्याशी अनैतिक संबंध होते. त्याचा संशय आल्यामुळेच भीमा यांनी तिला बाहेर काढले होते. आजही त्या रिक्षावाल्याशी आईचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले. परंतु पुरुषोत्तम त्याला काका म्हणत असे. आईने वडिलांविरुद्ध पुरुषोत्तमचे माथे भडकवले आणि आता रागाच्या भरात वडिलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली तो तुरुंगात आहे. पतीवर सूड उगविण्यासाठी पोटच्या पोराला भडकविणाऱ्या आईलाही तशी कदाचित अपेक्षा नसावी.

nishant.sarvankar@expressindia.com

@ndsarwankar