रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक आणि डॉ. भरत वाटवानी यांचा सत्कार

शिक्षण क्षेत्रात काळानुरुप बदल होत आहे. पण येणाऱ्य़ा काळात शिक्षण क्षेत्राला पुढे नेताना सोनम वांगचुक आणि डॉ. भरत वाटवानी यांच्या सारख्यांची महाराष्ट्राला गरज आहे. समाजातील प्रत्येकामधील भावनिक बुध्द्यांक वाढविण्यासाठी या दोघांनी महाराष्ट्राचे सदिच्छा दूत (ब्रॅड अ‍ॅम्बेसेडर) म्हणून काम करावे जेणेकरुन त्यांच्या कामामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी केले.

रॅमन मॅगसेसे पुरस्कार-२०१८ चे विजेते शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांचा सन्मान सोहळा आज सहयाद्री अतिथीगृह येथे शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, उच्च व तंत्रशिक्षण सचिव सौरभ विजय,शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, विविध विद्यापीठांचे कुलगुरु आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना तावडे पुढे म्हणाले, या दोन्ही रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांनी स्वत:शी संवाद साधून समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. मातीशी नाळ जुळविणारे शिक्षण असेल तर विद्यार्थी अधिक त्या शिक्षणामध्ये रस घेतात हे दिसून आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नेमके काय आवडते आहे हे जाणून प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न सोनम वांगचुक यांनी लडाखसारख्या दुर्गम भागात काम करताना केला. तर डॉ. भरत वाटवानी यांनी आपण समाजाचे देणे लागत असल्याने समाजासाठी काही तरी केले पाहिजे या भावनेतून मानसिक रुग्णांना आश्रय दिल्याचेही गौरवोद्गार तावडे यांनी यावेळी काढले.

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमधील संवाद कौशल्य वाढणे आवश्यक आहे. पण हे करीत असताना विद्यार्थ्यांचा नुसता बुध्यांक वाढून उपयोग नाही तर भावनिक बुध्यांक वाढणेही तितकेच आवश्यक आहे. म्हणूनच आजच्या शिक्षण पध्दतीत भावनिक बुध्यांकाची सांगड घालणे आवश्यक बनले असल्याचेही  तावडे यांनी यावेळी सांगितले.

तर  शिक्षणात सुधारणा होणे ही काळाची गरज असल्याचे सोनम वांगचुक यांनी सांगितले. मुलांना देण्यात येणारे शिक्षण भौगोलिक स्थिती यावर बरेचसे अवलंबून असते. मुलांना शिक्षण मिळण्यासाठी सांघिक प्रयत्न करताना मातृभाषेतून मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी आपण आग्रही असणे आवश्यक आहे. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना बदलत्या शिक्षणपध्दती प्रमाणे बदल केल्याचेही वांगचुक यांनी यावेळी सांगितले.

डॉ. भरत वाटवानी यावेळी म्हणाले, सुरुवातीला वेगळे काम करीत असल्याने त्रास झाला. पण समाजात राहणाऱ्य़ा एका व्यक्तीला तरी आपण बरे करु शकलो पाहिजे या विश्वासाने काम सुरु केले. आज वेगवेगळे आजार अनेकांना होतात पण अजूनही आपण मानसिक आजाराचे रुग्ण आहोत हे आपण पटकन मानायला तयार होत नाही त्यामुळे शालेय अभ्यासRमात मानसिक आजाराबाबत धडे देणे, विदयार्थ्यांना या आजाराबाबत पूर्ण माहिती देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.