सत्तरीच्या दशकातील गाण्यांची आवड असलेल्या अरुणा शानबाग यांच्यासाठी अजूनही केईएमच्या त्यांच्या खोलीत ती गाणी लावली जातात. एवढेच नव्हे, तर त्यांच्या उपचारांसाठी येत असलेल्या नर्सच्या दोन पिढय़ा बदलल्या असल्या तरी त्यांच्या आवडीचे मासे व गोड पदार्थ करून आणण्याच्या परंपरेत खंड पडलेला नाही. शानबाग यांच्याबद्दलची परिचारिकांची आत्मीयता तसूभरही कमी झालेली नाही.
 शुक्रवारी शानबाग यांची प्रकृती बिघडली तेव्हापासून त्यांच्या दिनचर्येत काहीसा बदल झाला आहे. मात्र इतर दिवशी सकाळी सात वाजता शानबाग यांचा दिवस सुरू होतो. स्पंजने अंग पुसून तसेच कपडे बदलून दिल्यावर साडेनऊच्या सुमारास नाश्ता दिला जातो. अन्न चावण्याची प्रक्रिया धीमी असल्याने नळीवाटे जेवण दिले जाते. दूध, प्रोटीनयुक्त आहार, रवा कांजी, वरण-भात त्यांच्या आहारात असतो. मात्र रोजचे हे जेवण करण्याचा त्यांनाही कधीतरी कंटाळा येतो. त्यांना गोड पदार्थ तसेच मासे आवडतात. त्यांच्या डोळ्यांमध्ये त्या भावना दिसतात. त्यामुळे त्यांची सेवा करणाऱ्या परिचारिका आवर्जून त्यांच्यासाठी वेगळे पदार्थ आणतात. आता दिवाळीतही त्यांना पेढा-बर्फी देण्यात आली होती, अशी माहिती मेट्रन अरुंधती वेल्हाळ यांनी दिली. अरुणा शानबाग यांच्या बहिणीचे नुकतेच निधन झाले असून शानबाग यांच्यासोबत काम केलेल्या नर्स व मेट्रन यांना भेटीसाठी बोलावण्याचा निर्णय केईएमने
घेतला आहे.
प्रकृती सुधारत आहे..
४० वर्षांंत पहिल्यांदाच आयसीयूत दाखल करण्याची वेळ आलेल्या अरुणा शानबाग यांची प्रकृती आता सुधारत असून देखरेखीसाठी त्यांना आणखी काही दिवस ऑक्सिजन पुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यांना श्वास घेण्यास अडथळा आल्याने शुक्रवारी रात्री वैद्यकीय अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. न्यूमोनिया झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांना औषधोपचार सुरू करण्यात आले. त्या उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांना नळीवाटे अन्नही देण्यात येत आहे, असे केईएमच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले.