चिमण्यांच्या पोटासाठी नेत्रचिकित्सकाची ‘दृष्टी’
चहुबाजूंनी फोफावलेल्या मुंबईतील सिमेंटच्या जंगलातील अध्र्या एकरामध्ये ज्वारीची शेती मोठय़ा दिमाखात उभी राहिली आहे. साधारणपणे माणूसभर उंचीचे ज्वारीचे टपोरे कणीस या शेतात बहरले आहे. आणखी दोन आठवडय़ात हुरडय़ाची मेजवानी होऊ शकते. परंतु हा शहरी शेतीचा खटाटोप आहे हरवत चाललेल्या चिमण्यांच्या पोटासाठी. .. भायखळा येथील जे.जे. रुग्णालयामध्ये नेत्रचिकित्सा विभागाच्या आवारातील ही ज्वारीची शेती सध्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी कुतुहल बनले आहे.
जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता व विख्यात नेत्रशल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांनी जे.जे. रुग्णालयात राहूनही आपली शेतीची आवड जोपासली आहे. येथील नेत्रचिकित्सा विभागाच्या इमारतीलगत असलेल्या अध्र्या एकर जागेवर डॉ. लहाने यांनी नारळ, चाफा, चिक्कूसह अनेक औषधी झाडेही लावली आहेत. यंदा त्यांनी उन्हाळी ज्वारीची लागवड केली आहे. उत्तम खत व योग्य निगराणी केल्यामुळे साधारणपणे फूटभराची कणसे तयार झाली असून चिमण्यांच्या खाण्यासाठी ही ज्वारी लावल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले. जे.जे.च्या आवारात वेगवेगळी फुलझाडेही त्यांनी लावली असून येथील आंब्याचे झाड फळांनी लगडलेले आहे.
जे.जे.मधील नेत्रविभागात वर्षांकाठी सुमारे १६ हजार रुग्णांवर डोळ्याच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्याशिवाय अधिष्ठाता म्हणूनही जबाबदारी पार पाडताना शेतीची आवड डॉ. लहाने यांनी आवर्जून जोपासली आहे. अडीच महिन्यापूर्वीच ज्वारी लावली. आता दोन आठवडय़ात कणसे हुरडय़ासाठी तयार होतील. मुंबईत सिमेंटच्या वाढत्या जंगलांमुळे चिमण्या कमी होऊ लागल्या आहेत. त्यांना खाण्यासाठी ज्वारी लावली, असे लहाने म्हणाले.