विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदच्या अभूतपूर्व यशानंतर गेल्या काही वर्षांपासून बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिरांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. एरवी सुट्टय़ा पडल्या की धूळ खात पडलेला बुद्धिबळ संच बाहेर काढायचा आणि तासन्तास खेळत बसायचे, हे चित्र बदलून आता या डोक्याची कसरत करायला लावणाऱ्या या खेळाबाबत व त्यातील ‘स्टार’ खेळाडूंबाबतचे आकर्षण वाढले आहे. आवड म्हणून बुद्धिबळाकडे वळलेल्या २१ वर्षीय सौम्या स्वामीनाथन हिने आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत अनेक दिग्गज बुद्धिबळपटूंना ‘चेकमेट’ केले आहे. या महिला ग्रँडमास्टरची बुद्धिबळातील यशस्वी कारकीर्द, दिग्गज बुद्धिबळपटूंसोबतचे अनुभव आणि सौम्याचा आतापर्यंतचा प्रवास याविषयी जाणून घेण्याची संधी ‘लोकसत्ता व्हिवा लाऊन्ज’ या कार्यक्रमात मिळणार आहे.
२२ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, २५२- वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर (प.) येथे रंगणार आहे.
२००८मध्ये स्पेनमधील स्पर्धेत सौम्याने सर्वोत्तम खेळाडूसह महिला ग्रँडमास्टरचा किताब पटकावला. ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्याकडून बुद्धिबळाचे बाळकडू गिरवणाऱ्या सौम्याने लहानवयातच गरुडझेप घेतली आहे. २००९मध्ये सौम्याने जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेला गवसणी घातली.
२०१० आणि २०११मध्ये राष्ट्रीय महिला अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या सौम्याने गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

केवळ एका अटीमुळे गिरणी कामगारांवर अपात्रतेची टांगती तलवर; म्हाडाकडून घर मिळणार की नाही…