कल्याणमधील फडके  मैदानात सुरू असलेल्या कोळी आगरी मालवणी महोत्सवात रात्री बारा वाजेपर्यंत ऑर्केस्ट्रा सुरू ठेवल्याने, डीजेचा वापर करून ध्वनिप्रदूषण केल्याने बाजारपेठ पोलिसांनी महोत्सवाचे संयोजक देवानंद भोईर यांच्यावर ध्वनिप्रदूषणाचा गुन्हा दाखल केला.
अंबरनाथ, बदलापूर येथील पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, आमदार नरेंद्र पवार यांनीही प्रचार संपल्यानंतर कल्याणमध्ये येऊन या महोत्सवाचा स्वाद घेतला. त्यांच्या उपस्थितीत रात्रीची दहाची वेळ टळून गेली तरी डीजेचा दणदणाट सुरू होता. मंत्री महोदयांच्या ही बाब संयोजकांच्या का लक्षात आणून दिली नाही, अशी मागणी या भागातील रहिवाशांकडून केली जात आहे.
परीक्षांचा हंगाम सुरू आहे, त्यात हा दणदणाट, त्यामुळे या भागातील विद्यार्थी या दणदणाटामुळे हैराण होते. अखेर खूप ओरड झाल्याने पोलिसांनी संयोजकांवर गुन्हा दाखल केला.