मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या काळा घोडा परिसरातील आर्ट अव्हेन्यू सुशोभिकरण व रोषणाई प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी लोकार्पण करण्यात आले. काळा घोडा प्लाझा, बी. भरुचा मार्ग येथे हा लोकार्पण सोहळा पार पडला. नामांकित उपाहारगृहे, कॅफे, रेस्टॉरंट्स, दागिन्यांची दालने, वस्त्रांची आकर्षक शोरूम्स, कला दालने आणि वारसास्थळांनी नटलेला हा परिसर आता युरोपमधील खुल्या सांस्कृतिक रस्त्यांचा अनुभव देणार आहे.

दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला काळाघोडा परिसर मुंबईच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक वारशाचे प्रतीक मानला जातो. या परिसरात नागरिक आणि देश-विदेशातील पर्यटकांना पायी फिरण्याचा सुरक्षित, आनंददायी अनुभव मिळावा, तसेच ”हेरिटेज वॉक”ला नवे परिमाण लाभावे, या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेतर्फे परिसरातील विविध रस्त्यांचे व्यापक सुशोभिकरण करण्यात आले. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

या प्रकल्पामुळे मुंबईला नवीन कलात्मक आयाम मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेने तत्कालीन ऐतिहासिक वास्तुकलेशी समरस कलात्मक विभाग तयार केल्यामुळे काळाघोडा परिसराचे सौंदर्य आणखी खुलले आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी काळाघोडा परिसर सुशोभिकरण आणि रोषणाई प्रकल्पाचे कौतुक केले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष तथा स्थानिक आमदार ॲड. राहुल नार्वेकर, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, महापौर रितू तावडे, सभागृह नेता गणेश खणकर, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, स्थानिक नगरसेवक ॲड. मकरंद नार्वेकर, पालिका अधिकारी, काळाघोडा परिसरातील रहिवासी, व्यावसायिक उपस्थित होते.

या पाच रस्त्यांचे सुशोभिकरण

मुंबईकर आणि पर्यटकांना अधिक समृद्ध ‘हेरिटेज वॉक’चा अनुभव मिळावा, या उद्देशाने साईबाबा मार्ग, रोप वॉक लेन, डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग (फोर्ब्स स्ट्रीट), रुदरफोर्ड स्ट्रीट आणि बी. भरुचा मार्ग या पाच रस्त्यांचे सौंदर्यीकरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात सुमारे ३ हजार ४४३ चौरस मीटर क्षेत्रफळावर, म्हणजेच सुमारे ५०० मीटर लांबीच्या परिसराचा कायापालट करण्यात आला.

खुल्या जागेत टेबल-खुर्च्यांची आकर्षक बैठक व्यवस्था

नामांकित उपाहारगृहे, कॅफे, रेस्टॉरंट्स, दागिन्यांची दालने, वस्त्रांची आकर्षक शोरूम्स, कला दालने आणि वारसास्थळांनी नटलेला हा परिसर आता युरोपमधील खुल्या सांस्कृतिक रस्त्यांची आठवण करून देणार आहे. युरोपातील अनेक शहरांप्रमाणे रस्त्यालगतच्या कॅफे आणि उपाहारगृहांसमोर खुल्या जागेत टेबल-खुर्च्यांची आकर्षक बैठक व्यवस्था करण्यात आली असून पर्यटकांना मोकळ्या वातावरणात चहा, कॉफी, नाश्ता किंवा विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत परिसरातील कलात्मक वातावरण अनुभवता येणार आहे. त्यामुळे काळाघोडा परिसर केवळ पाहण्याचे नव्हे तर निवांत वेळ घालवण्याचे आणि अनुभवण्याचेही एक वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळ ठरणार आहे.

अवजड वाहनांना प्रवेश बंदी

या प्रकल्पांतर्गत परिसरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार असून, चारही बाजूंना अद्ययावत बॅरिकेड्स उभारण्यात येणार आहेत. बी. भरुचा मार्गावरील चौकात आकर्षक ”काळा घोडा प्लाझा” विकसित करण्यात आला आहे. प्लाझासाठी करडा आणि काळा ग्रॅनाईट, तसेच बेसॉल्ट फरशीचा वापर करण्यात आला आहे. संपूर्ण परिसरात सौंदर्यपूर्ण, वळणदार आणि पादचाऱ्यांसाठी सुलभ पायवाटा तयार करण्यात आल्या आहेत. हे पाच रस्ते प्रत्येक शनिवार आणि रविवारी सायंकाळी ६ ते रात्री १२ या कालावधीत वाहनांसाठी बंद ठेवून केवळ पादचाऱ्यांसाठी खुले ठेवण्यात येणार आहेत.