मुंबई : दक्षिण मुंबईतील मराठी भाषा भवन इमारतीच्या कामाला काही कारणांमुळे विलंब झाला होता. आता वेगाने काम सुरू आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत मराठी भाषा भवनाच्या एक भागाचे लोकार्पण केले जाईल. ऐरोली येथे एक उपकेंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. लंडनमध्येही ‘मराठी भाषा वैश्विक केंद्र’ सुरु करणार आहोत, अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली.

भाई जगताप यांनी नियम ९३ अन्वये मराठी भाषा भवन संदर्भात चर्चा उपस्थित केली होती. केंद्र सरकारने मराठी भाषेला दिलेला अभिजात दर्जा कागदावरच आहे. हा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवन कधी उभारणार आणि तोपर्यंत राज्य सरकार कोणती पावले उचलणार, असा प्रश्न जगताप यांनी उपस्थित केला होता.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या जतन व संवर्धनासाठी राज्य सरकार विविध उपक्रम राबवत आहे. दक्षिण मुंबईतील धोबी तलाव परिसरात ‘मराठी भाषा भवन’ उभारण्याचा प्रकल्पही राज्य सरकारकडून राबवला जात आहे. सुरुवातीला या प्रकल्पासाठी ११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सध्या सुमारे १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पण इमारतीसाठी निवडलेली जागा समुद्राच्या समांतर आहे. त्यामुळे तेथे खोदकाम करताना पाणी येत असल्याने काँक्रिटीकरणाला वेळ लागल्यामुळे कामाला विलंब झाला होता. आता काम गतीने सुरू आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत मराठी भाषा भवनाच्या एक भागाचे लोकार्पण करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.

साहित्यिकांच्या मागणीनुसार नवी मुंबईतील ऐरोली येथे मराठी भाषेवर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांसाठी स्वतंत्र उपकेंद्र उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या संशोधन केंद्रासाठी सुमारे ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या ठिकाणी मराठी साहित्यिकांच्या निवासाची सोय करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

अभिजात मराठीच्या संशोधन केंद्रासाठी प्रस्ताव

मराठी भाषा आणि संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. नाशिक येथे ‘विश्व मराठी संमेलन’ आयोजित करण्यात आले. या संमेलनात देश – विदेशातील पाचशेहून जास्त मराठी उद्योजक आणि अभ्यासक सहभागी होतात. हा उपक्रम पुढेही सुरू ठेवणार आहोत. सरकारने ‘अभिजात मराठीच्या संशोधनासाठी केंद्र’ स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे.  अभिजात भाषेच्या अभ्यासासाठी प्रस्ताव देणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला.

 इंग्लडमध्ये ‘वैश्विक मराठी भाषा केंद्र’

मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी लंडनमध्ये ‘वैश्विक मराठी भाषा केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या केंद्रासाठी लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीची पाच कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जागतिक मराठी भाषा केंद्र उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.