मुंबई : यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला. खाद्यतेलाच्या आयातीवर शुल्क लागू केल्यानंतरही अपेक्षित दरवाढ झाली नाही, अशी कबुली देतानाच आता उत्पादीत झालेल्या सर्व तूर, उडीद, मसूर या कडधान्यांची हमीभावाने खरेदी करण्यात येईल, असेही केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली.

दिल्लीमध्ये देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना चौहान म्हणाले, यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला. खाद्यतेलावर आयात शुल्क नसल्यामुळे सोयाबीनचे दर पडल्याचा आरोप होत होता. त्यामुळे खाद्यतेलावर आयातशुल्क वाढवून सोयाबीनच्या दराला आधार देण्याचा प्रयत्न केला. तरीही सोयाबीनच्या दरात अपेक्षित वाढ झाली नाही. जागतिक परिस्थितीमुळे सोयाबीनचे दर पडले आहेत.

आता खरीप आणि रब्बी हंगामात उत्पादन होणाऱ्या कडधान्यांची हमीभावाने खरेदी करण्यात येईल. प्रामुख्याने उत्पादित होणारी तूर, उडीद आणि मसूर हमीभावाने खरेदी केली जाईल. त्यामुळे कडधान्यांना चांगला दर मिळाला. देशातून तांदळाच्या निर्यात करण्यावर निर्बंध होते, आता तेही उठविले आहेत. यंदाच्या हंगामात गहू आणि तांदळाच्या खरेदीचे केंद्र सरकारने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करू, असेही चौहान म्हणाले.

हमीभावापेक्षा ४०० रुपये कमी मिळाले केंद्र सरकारने सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला होता. प्रत्यक्षात खासगी बाजार आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून ४,३०० ते ४,४०० रुपये दराने सोयाबीनची विक्री झाली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सरासरी ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. शिवाय सरकारने हमीभावाने खरेदीचे निश्चित केलेले उद्दिष्ट्येही पूर्ण करता आले नाही.