मुंबई : सोयाबीनच्या निकृष्ट बियाणांचा विदर्भ आणि मराठवाड्यातील दहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीनच्या बियाणाची अपेक्षित उगवण झाली नाही, अशी एकूण १८ बियाणे कंपन्यांच्या विरोधात तक्रारी असून, त्यापैकी चार कंपन्यांविरोधात सर्वाधिक तक्रारी आहेत. बियाणाचे ५८१ नमुने अप्रमाणित निघाले असून, कृषी विभागाच्या वतीने १८१ प्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहेत.
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, १३ जुलैअखेर राज्यात ३७ लाख ३६ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबीन बियाणांच्या उगवण क्षमतेबाबत अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, लातूर, धाराशिव, या जिल्ह्यांतून कृषी विभागाकडे तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ या चार जिल्ह्यांत तक्रारींचे प्रमाण जास्त आहे.
२,६२० क्विंटल बियाणे जप्त
कृषी विभागाने सोयाबीन बियाण्यांचे एकूण ५६३८ नमुने तपासणीसाठी घेतले होते, त्यापैकी जवळपास ५८१ नमुने अप्रमाणित (निकृष्ट) निघाले आहेत. बियाणे अप्रमाणित निघालेल्या कंपन्यांवर कृषी विभागाकडून १८१ प्रकरणी न्यायालयात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बियाणे उगवण क्षमतेबाबत ३६१५ तक्रारी आल्या होत्या, त्यापैकी १७३८ तक्रारींची प्रत्यक्ष शेतावर जाऊन तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीद्वारे तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित १८७७ तक्रारींची प्रत्यक्ष शेतात जाऊन तपासणी एक आठवड्यात करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत ज्या बियाण्या कंपन्यांचे नमुने अप्रमाणित आले आहेत, त्यांचे कृषी सेवा केंद्रातील व साठवणूक ठिकाणावरील २,६२० क्विंटल बियाणे जप्त करण्यात आले आहे.
१८ बियाणे कंपन्यांविरोधात तक्रारी
बियाणे उगवण क्षमते बाबत तक्रारी असलेल्या एकूण १८ बियाणे कंपन्या आहेत. तथापि, सर्वात जास्त तक्रारी चार कंपन्यांच्या विरोधात आहेत. प्रमुख चार कंपन्यांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम, बीज कायदा, बियाणे नियम १९६८ आणि भारतीय न्याय संहितेतील कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासणी होईल, तसे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. संबंधित कंपन्यांना बियाणे विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हा ग्राहक मंचाकडे दावे दाखल करा – कृषिमंत्री
ज्या शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणांचा फटका बसला आहे, उगवण क्षमतेपेक्षा ७० टक्के कमी उगवले आहे. त्या शेतकऱ्यांनी संबंधित बियाणे कंपनी विरोधात तातडीने जिल्हा ग्राहक मंचाकडे नुकसान भरपाई साठी दावे दाखल करावेत. संबंधित कंपन्यांकडून शेतकऱ्यांना निशुल्क, चांगले बियाणे बदलून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. बाधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
