मुंबई : राजकीय गटांतील शत्रुत्त्वामुळे दादर परिसरात जमावाने वीस वर्षांपूर्वी म्हणजेच २००५ साली केलेल्या हिंसाचार प्रकरणातून खासदार रवींद्र वायकर आणि तत्कालीन अविभाजित शिवसेनेच्या २८ कार्यकर्त्यांची विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.

बाळसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर विद्यमान खासदार नारायण राणे यांनी त्यावेळी काँग्रेसमध्ये सामील होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर २४ जुलै २००५ मध्ये दादर येथील जाखा देवी चौकात निदर्शनासाठी जमाव जमला होता. काही वेळाने हिंसक झालेल्या जमावाने पोलिसांवर, त्यांच्या गाड्यांवर आणि बेस्ट बसवर दगडफेक केली होती. परिणामी, परिसरात कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी वायकर आणि अन्य आरोपींवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खासदार आणि आमदारांविरुद्ध दाखल खटल्यांचे कामकाज पाहणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी या प्रकरणी निकाल देताना वायकर आणि अन्य आरोपींची दंगल, बेकायदेशीर सभा आणि इतर आरोपांतून निर्दोष सुटका केली. वायकर यांच्याव्यतिरिक्त इतर आरोपींमध्ये सेनेचे नेते महेश सावंत आणि विशाखा राऊत यांचा समावेश आहे. आरोपी दंगल करणाऱ्या बेकायदेशीर जमावाचा भाग होते की नाही हे निश्चितपणे सांगता नाही, असे न्यायालयाने आरोपींची सुटका करताना निकालात म्हटले.

दोन राजकीय गटांमधील राजकीय शत्रुत्वामुळे संपूर्ण मुंबई शहर घटनेच्या दिवशी धोक्यात आले होते. पोलिस दल मोठ्या प्रमाणात तैनात असूनही, अनेक जण जखमी झाले आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. तथापि, आरोपी सहभागी होते याची ओळख पटलेली नाही. त्यामुळे त्यांची सुटका करण्यात येत असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

प्रकरण काय ?

सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही १०० ते १५० शिवसेना कार्यकर्त्यांचा जमाव दादरमधील जाखा देवी चौक परिसरात रास्ता रोको आणि निदर्शनासाठी जमला होता. जमाव हिंसक झाला आणि त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले केले. त्या घटनेत बेस्ट बसेसचे नुकसान झाले होते.