scorecardresearch

भारतीय संदर्भातून मानवी इतिहासाचे दर्शन

या प्रदर्शनाची संपूर्ण रचना आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाच्या सुरक्षा नियमांप्रमाणे करण्यात येत आहे.

भारतीय संदर्भातून मानवी इतिहासाचे दर्शन
जागतिक दर्जाचे वस्तुप्रदर्शन फोर्ट येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ११ नोव्हेंबर पासून खुले होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात विशेष प्रदर्शन

अश्मयुगीन काळापासून सुरु झालेल्या मानवी इतिहासाचा वैश्विक पातळीवर भारताशी असलेला संदर्भ वस्तुरुपी उलगडणारे भारतातील आजवरचे सर्वात मोठे वस्तुप्रदर्शन पाहण्याची पर्वणी येत्या काही दिवसात मिळणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, द ब्रिटीश म्युझियम आणि दिल्लीस्थित राष्ट्रीय संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘देश-परदेश, नऊ अध्याय एक इतिहास’ हे जागतिक दर्जाचे वस्तुप्रदर्शन फोर्ट येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ११ नोव्हेंबर पासून खुले होणार आहे. यानिमित्ताने लंडन येथील प्रसिद्घ ‘द ब्रिटीश म्युझियम’ येथील प्राचीन वस्तु प्रथमच भारतामध्ये येत असून त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.

सतरा लाख वर्षांपूर्वी मानवाने बनविलेले दगडी हत्यार, इ.स.पूर्व २४०० मधील स्त्री मूर्ती, इ.स.पूर्व पहिल्या शतकातील ग्रीक सागरी देवाताची मूर्ती आणि इ.स. १२५० साली गुजरात मध्ये बनविलेले मात्र इजिप्त मध्ये सापडलेले कापड अशा पद्धतींच्या सुमारे २१० वस्तु, कापड व चित्रांचा खजिना मुंबईकरांच्या भेटीला आला आहे. भारताचा अश्मयुगीन ते स्वांतत्र्यपूर्व काळातील इतिहासाचा मागोवा घेत असताना, त्याचा जगाशी वस्तुरुपी संबंध जोडणे हा ‘देश-परदेश, नऊ अध्याय एक इतिहास’ या प्रदर्शनाचा मूळ विषय आहे. अश्मयुगीन काळ, प्राचीन शहरांचा विकास, साम्राज्ये, राज्य आणि धर्म, प्राचीन मूर्तीपूजा, व्यापार, दरबार संस्कृती, स्वातंत्र्याचा शोध आणि समकालीन जग या नऊ विभागांमध्ये या प्रदर्शनाची संकल्पना मांडण्यात आली आहे. भारतात प्रथमच एवढय़ा मोठय़ा स्तरावरील वस्तुप्रदर्शन होत आहे.

वस्तुसंग्रहालयाचे महासंचालक सब्यसाची मुखर्जी यांच्या संकल्पनेने साकारल्या जाणाऱ्या या प्रदर्शनाच्या तयारी गेल्या दीड वर्षांपासून सुरु आहे. भारतातील २८ पुरातन शास्त्र संस्था आणि संग्रहालयांच्या वैयत्किक प्रदर्शनातील वस्तुंचा समावेश या प्रदर्शनामध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ब्रिटीश संग्रहालयाने आपल्या १२० वस्तु या प्रदर्शनासाठी पाठविल्या आहेत. १६ हजाार चौरस फूट क्षेत्रफळावर साकरण्यात येणाऱ्या या प्रदर्शनासाठी संग्रहालयातील कॉईन गॅलरी, सेमिनार रुम, जहांगीर निकॉलसन व प्रेमचंद रॉयचंद गॅलरी रिकामी करुन त्यांचा कायापालट करण्यात आला आहे. प्रदर्शनातील वस्तु या संग्रहालयात दाखल झाल्यापासून त्याची तपासणी ते मांडणीपर्यतचे सर्व काम हे खुशल कारागीर व तज्ज्ञ मार्गदर्शक करत असल्याची माहिती संग्रहालयाच्या सहाय्यक संचालिका मनिषा नेने यांनी दिली.

सुरक्षा उपाययोजना

या प्रदर्शनाची संपूर्ण रचना आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाच्या सुरक्षा नियमांप्रमाणे करण्यात येत आहे. वस्तूची दळवळण ते प्रदर्शन स्थळी त्यांना नेणे, त्यांची मांडणी करणे त्यावर सुरक्षा उपकरण बसविणे, त्यावर प्रकाशयोजना करणे यासाठी वेगवेगळे गट कार्यरत आहेत. प्राचीन इतिहास उलगडणाऱ्या या वस्तूंना धक्का न लागता काळजीपूर्वक हाताळणी करणे आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे प्रकल्प व्यवस्थापन गटातील सदस्य विनीत काजळोकर यांनी सांगितले. याशिवाय वस्तुसंग्रहालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर प्रदर्शनाची मांडणी केली जात असल्याने तिथपर्यंत या वस्तूंना नेण्यासाठी सुरक्षा नियमांची विशेष काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रिटीश संग्रहालयामधून काय ?

इ.स.पूर्व २५००-२३०० मधील चीनमध्ये सापडलेले मातीचे भांडे, इ.स.पूर्व २४०० मधील इराक मध्ये सापडलेली स्त्री मूर्ती, इ.स.१७५०-१८०० मधील हवाई येथे सापडलेली युद्ध देवताची मूर्ती, बाराव्या शतकातील इंडोनेशिया येथे सापडलेली गणेश मूर्ती, चौथ्या शतकातील तुनेशिया मध्ये सापडलेला रोमन दागिना, इ.स.पूर्व १६५६-१६६१ या शतकातील हॉलंड येथे सापडलेले जहांगीर बादशहाचे छायाचित्र आणि  दुसऱ्या शतकातील रोमन कालीन डिस्कॉबोल्युसची मूर्ती अशा बऱ्याच काही ब्रिटीश संग्रहालयातील महत्वपूर्ण वस्तू या प्रदर्शनात पाहता येणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-11-2017 at 02:31 IST

संबंधित बातम्या