मुंबई: अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये पूर्ण झाल्यानंतर शिक्षण संचालनालयाने मंगळवारी रात्री अचानक विशेष फेरी जाहीर केली. त्यानुसार ही फेरी १० ते १६ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. या फेरीसाठी बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी व भाग १ भरायचा आहे. मात्र शिक्षक संघटनांनी या फेरीच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित करत काही जवळच्या व्यक्तींसाठी ही फेरी राबवण्यात येत असल्याची टीका केली आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयातर्फे अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्यभरात पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आली. मात्र या प्रक्रियेत वारंवार येत असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही प्रक्रिया बराचकाळ लांबली होती. त्यानुसार चार नियमित फेऱ्या व जवळपास नऊ विशेष फेऱ्या राबविण्यात आल्या. ऑक्टोबरमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अयशस्वी ठरल्याची टीका विविध स्तरावरून होत होती. त्यातच शिक्षण संचालनालयाने ८०० मुलांसाठी मंगळवारी रात्री अचानक विशेष फेरी जाहीर केली. या फेरीचे परिपत्रक मंगळवारी रात्री ११ वाजता काढण्यात आले. तसेच हे परिपत्रक सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी संचालनालयाकडून कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे ही फेरी नेमकी कोणासाठी राबविण्यात येत आहे, असा प्रश्न शिक्षक संघटनांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
निम्मे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर डिसेंबरच्या मध्यात अचानक प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा शिक्षण संचालनालयाच्या निर्णयातून ऑनलाईन प्रवेश फेरीचे अपयश उघडकीस आले आहे. ही फेरी काही महाविद्यालयांमधील जागा भरण्यासाठी राबविण्याची शंका आहे. अंतिम परीक्षेसाठी आवश्यक ७५ टक्के उपस्थितीचा निकष या विद्यार्थ्यांना लागू होणार का असे प्रश्न महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे यांनी उपस्थित केले. डिसेंबरच्या मध्यामध्ये विशेष फेरी राबविणे म्हणजे विद्यार्थ्यांचे नुकसान निश्चित आहे. फेब्रुवारीमध्ये बारावीच्या परीक्षा सुरू होणार असल्याने या फेरीतील विद्यार्थ्यांना जेमतेम एक महिनाच मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थ्यांना शक्य नसल्याने त्यांचे नुकसान होणार आहे, अशी टीका मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली.
विशेष फेरीचे वेळापत्रक
नव्याने जाहीर करण्यात आलेल्या विशेष वेळापत्रकानुसार ११ ते १२ डिसेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी व भाग १ मध्ये दुरुस्ती करता येणार आहे. ११ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार आहे. १२ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत भाग २ भरता येणार आहे. १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता निवड यादी जाहीर होईल. १५ आणि १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.
काही पालकांच्या बदल्या झाल्या आहेत. तसेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाचे प्रवेश काही विद्यार्थ्यांनी रद्द केले. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी अर्ज करण्यात आले होते. राज्यभरातून जवळपास ८०० विद्यार्थ्यांकडून अर्ज आले आहेत. त्यामुळेच ही विशेष फेरी राबविण्यात आली आहे. – श्रीराम पानझडे, सहसंचालक, शिक्षण संचालनालय

