मुंबई : ज्याप्रमाणे आपण आरोग्यासाठी नियमित ‘चेकअप’ करतो, तसेच आपल्या पैशांची आरोग्य तपासण्याची आणि गुंतवणुकीची तंदुरुस्ती जोखण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. याचेच विनामूल्य मार्गदर्शन असलेले ‘लोकसत्ता अर्थभान’चे सत्र रविवारी (आज) सायंकाळी विलेपार्ले येथे योजण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे ‘आदित्य बिर्ला सन लाइफ मुच्युअल फंड’ मुख्य प्रायोजक आहेत. हा कार्यक्रम रविवार, ८ फेब्रुवारी २०२६, सायंकाळी ६.०० वाजता, लोकमान्य सेवा संघ, पु. ल. देशपांडे सभागृह, ३ रा मजला, विलेपार्ले (पू.) येथे होत आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, उपस्थितांना या कार्यक्रमात सिबिल स्कोअर आणि गुंतवणूक नियोजनाविषयी प्रश्न व शंकांचे निरसन करता येईल.
उच्चशिक्षण, पर्यायाने नोकरीच्या चांगल्या संधी, भरगच्च पगार यामुळे वयाच्या अगदी बावीस-पंचविसाव्या वर्षीच तरुणांहाती चांगलाच पैसा खेळू लागला आहे. मात्र या पैशाला अपेक्षित वळण लावणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ‘गुंतवणूक नियोजन आणि आर्थिक आरोग्य तपासणी’ या विषयाद्वारे अर्थ विषयाचे अभ्यासक डॉ. वीरेंद्र ताटके हे याच अंगाने मांडणी करतील. अगदी थोड्याथोडक्या बचतीतून संपत्ती निर्माण करता येणे कसे शक्य आहे, हे उदाहरणांसह समजावून सांगतील.
बऱ्याचदा अडीअडचणीच्या काळात कर्ज घेतले जाते. मात्र, परतफेडीचे नियोजन योग्य पद्धतीने न केल्यास त्याचा थेट परिणाम म्हणजे आपला क्रेडिट स्कोअर घसरतो. या स्कोअरवरूनच आपले आर्थिक वर्तन प्रतिबिंबित होत असते. हा सिबिल स्कोअर म्हणजे नेमका काय? तो कसा वाढवावा आणि त्याचे महत्त्व काय, या प्रश्नांची उत्तरे या विशेष सत्रात सिबिलचे मुख्य वित्तीय अधिकारी निखिल राजाध्यक्ष हे देतील. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल.
गुंतवणूक नियोजन आणि आर्थिक आरोग्य तपासणी
– डॉ. वीरेंद्र ताटके (अर्थ विषयाचे अभ्यासक)
वैयक्तिक पत कशी तपासावी?
निखिल राजाध्यक्ष (मुख्य वित्तीय अधिकारी, सिबिल)
कुठे: लोकमान्य सेवा संघ, पु. ल. देशपांडे सभागृह, ३ रा मजला, विलेपार्ले (पू.)
कधी : रविवार, ८ फेब्रुवारी २०२६, सायंकाळी ६.०० वाजता

