लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई महापालिकेच्या एखाद्या रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूमुळे संघर्ष झाला तर परिस्थिती कशी हाताळायची मोठा अपघात किंवा दुर्घटनेत रुग्ण जास्त संख्येने येतात अशी वेळ तसेच रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था नेमकी कशी हाताळायची याचे विशेष प्रशिक्षण देण्याचा अभिनव सुरक्षा सप्ताह उपक्रम आज सोमवारपासून महापालिकेच्या शीव रुग्णालयात सुरु झाला आहे.

प्रामुख्याने करोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थापन हे एक आव्हान बनले आहे. यातूनच रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्या संकल्पनेतून शीव रुग्णालयात सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामान्यपणे रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात रोज ६५०० रुग्ण उपचारासाठी येतात तर जवळपास १४५० रुग्णांवर दाखल करून उपचार केले जातात. रुग्णालयात एकूण ४० ऑपरेशन थिएटर असून करोनाच्या काळातही रोज साधारणपणे २५० ते ३०० शस्त्रक्रिया केल्या जातात. सध्या करोना रुग्णांसाठी २७७ खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून अपघात विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्याही खूप मोठी आहे. रुग्णालयातील इमारती, निवासी डॉक्टरांच्या इमारतींसह अनेक ठिकाणी चोख सुरक्षेची आवश्यकता असताना पालिकेच्या बहुतेक रुग्णालयात पुरेसे सुरक्षा रक्षक नाहीत. परिणामी आहे त्या सुरक्षा व्यवस्थेचा परिणामकारक वापर करणे आवश्यक ठरते. महत्वाचे म्हणजे रुग्णालयीन सुरक्षा व्यवस्था व अन्य ठिकाणची सुरक्षा व्यवस्था यात मोठा फरक असल्याचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. रुग्णालयीन सुरक्षा व्यवस्थेत सुरक्षा रक्षकांना जागोजागी रुग्ण व नातेवाईकांशी संपर्क येत असल्याने त्यांच्या वागण्यात मृदुता असणे आवश्यक ठरते.

जगातील अनेक देशात रुग्णालयीन सुरक्षा हा स्वतंत्र विषय आहे. मात्र मुंबई महापालिका रुग्णालयांत अशी कोणतीही स्वतंत्र व्यवस्थाही नाही तसेच त्यादृष्टीने वेगळे प्रशिक्षणही आजपर्यंत कधी देण्यात आले नव्हते. यातूनच डॉ. मोहन जोशी यांनी सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले. यात सुरक्षा रक्षकांना केवळ रुग्णालयीन सुरक्षेचे प्रशिक्षण मिळणार नसून त्यांचे आरोग्य कसे उत्तम राखता येईल याचेही मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टरांकडून केले जाणार आहे. तसेच या सर्व सुरक्षा रक्षकांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी केली जाणार असल्याचे डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. या सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पालिका उपायुक्त देवीदास क्षीरसागर यांनी शिव रुग्णालयाप्रमाणेच पालिकेच्या अन्य रुग्णालयातही हा उपक्रम राबवला जाईल असे सांगितले. तसेच सुरक्षा रक्षकांसाठी स्वतंत्र डाएट व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी मुंबई महापालिका सुरक्षा विभागाचे प्रमुख रवींद्र पाटील तसेच उपसुरक्षाप्रमुख अजित तावडे, अॅकॅडमिक डिन डॉ. प्रमोद इंगळे, प्राध्यापक सीमा बनसोडे व सहयोगी प्राध्यापक डॉ हिना मर्चंट आदी उपस्थित होते.

शीव रुग्णालयात सुरक्षेच्या दृष्टीने एकूण ३४ महत्वाची ठिकाणे आहेत. यात मुख्य प्रवेशद्वारांपासून अपघात विभाग, लहान मुलांचा विभाग आदी जागा येतात. रुग्णालयाला किमान २५० सुरक्षा रक्षकांची गरज असून प्रत्यक्षात ५० पूर्णवेळ व अन्य खासगी सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून सुरक्षेची तजवीज केली जाते. पालिकेच्या केईएम व नायर रुग्णालयासह अन्य सर्व रुग्णालयात बहुतेक सुरक्षा व्यवस्था खासगी यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून किमान रुग्णालयांत तरी पूर्णवेळ व रुग्णालयीन सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तैनात केले पाहिजे असे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांवरील हल्ले रोखणे व जमावाला हातळण्यासाठीचे प्रशिक्षणही या सुरक्षा रक्षकांना दिले पाहिजे, असे पालिकेच्या काही डॉक्टरांनी सांगितले.

पालिकेकडे आज ४००० सुरक्षा रक्षकांची पदे असून प्रत्यक्षात केवळ २४०० सुरक्षा रक्षक असून पालिका मुख्यालय, जलवाहिन्या, मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलाशय व रुग्णालयांसह अन्य पालिका मालमत्तांच्या संरक्षणासाठी किमान १० हजार सुरक्षा रक्षक व अधिकारी आवश्यक आहेत असे सुरक्षा विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.