मुंबई : भरधाव वेगात आलेल्या पालिकेच्या एका गाडीने दुचाकीस्वाराला धडक दिल्याची घटना गुरुवारी चेंबूर परिसरात घडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी पालिकेच्या गाडीचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

पूर्व द्रुतगती मार्गावरील छेडा नगर परिसरात गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली. दुचाकी चालक जयंतीलाल परमार (५५) मुंबईहून ठाण्याच्या दिशेने त्यांच्या दुचाकीवरून जात होते. छेडा नगर परिसरातून जाणाऱ्या पालिकेच्या कचरावाहू वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा…मुंबईतील ११६ शिव योगा केंद्रातून ३१ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतले प्रशिक्षण

घटनेची माहिती मिळताच टिळक नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी चालक आझाद आलम (२५) याला अटक करण्यात आली.