मुंबईः मालाड परिसरात मंगळवारी रात्री भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरगाडीने दिलेल्या धडकेत २६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात चालक दारूच्या अंमलाखाली असल्याचे निष्पन्न झाले. मृत महिला पती व दोन मुलांसोबत त्याच परिसरात राहत होती. शहाना काझमी असे मृत महिलेचे नाव असून त्या मेहंदी क्लासेससाठी गेल्या होत्या. तेथून परतत असताना रात्री १० च्या सुमारास एका मोटरगाडीने त्यांना धडक दिली. हेही वाचा >>> Emergency Movie : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर; प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार वाहन चालवणाऱ्याने स्वतः त्यांना रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चालक अनुप सिन्हा (४५) याला निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मोटरगाडीची तोडफोड केली. तसेच आरोपीलाही मारहाण केली. मालाड पोलिसांनी चालकाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले. त्यात चालक दारूच्या अंमलाखाली मोटरगाडी चालवत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी मर्चंट नेव्हीमध्ये कामाला आहे.