मुंबई : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने स्पाइसजेटच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग प्रक्रियेत प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या “डार्क पॅटर्न्स”च्या वापराबद्दल १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय, आधीच्या वेगवेगळ्या ग्राहक तक्रार प्रकरणांमध्ये कंपनीला विविध दंडात्मक रकमेची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने स्पाइसजेट या विमान कंपनीवर कारवाई करून दंड आकारला आहे. कंपनी तिकीट बुकिंगच्या वेळी वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर डार्क पॅटर्नसारख्या डिजिटल डिझाइनचा वापर करत होती. ज्यामुळे प्रवाशांना त्यांच्या संमतीशिवाय काही विशिष्ट सेवा स्वीकाराव्या लागत होत्या. त्या माध्यमातून अधिक पैसे घेतले जात होते. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणच्या मते, अशा पद्धतींमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि त्यांना नकळतपणे काही विशिष्ट सेवा व जाहिरात संदेशांशी जोडले जाते. यामुळे प्रवाशांकडून जास्तीचे पैसे आकारले जात होते.
स्पाइसजेटच्या वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर तिकीट बुकिंग करताना प्रवासी जेव्हा प्रक्रियेला सुरुवात करतात तेव्हा प्रक्रिया सुरु करताना त्यातील काही पर्याय आधीच निवडलेले होते. यामुळे अनेक ग्राहक नकळतपणे स्पाइसक्लब लॉयल्टी प्रोग्रामचा भाग बनले. इतकेच नाही, तर ईमेल, व्हॉट्सॲप आणि इतर माध्यमांद्वारे जाहिरात संदेश मिळवण्यासाठीची संमती आपोआप नोंदवली जात होती. या सगळ्यामुळे ग्राहकांच्या परवानगी शिवाय त्यांच्या वैयक्तिक सोशलची परवानगी त्यांच्या नकळत घेतली जायची.
कोणते छुपे प्रकार आढळले?
ग्राहकांना त्यांच्या स्पष्ट संमतीशिवाय लॉयल्टी प्रोग्राममध्ये समाविष्ट करणे. वेबसाइटवर काही विशिष्ट पर्याय पूर्वनिर्धारितपणे निवडणे. ग्राहकांना सहज गोंधळात टाकणारी शब्दरचना आणि इंटरफेस वापरणे.
दंड का?
आधीच टिक केलेल्या बॉक्सद्वारे किंवा फसव्या डिझाइनद्वारे मिळवलेली संमती वैध मानली जाऊ शकत नाही. हे ग्राहक संरक्षण कायदा २०१९ आणि ई-कॉमर्स नियम २०२० चे उल्लंघन आहे. नोटीस मिळाल्यानंतरही, कंपनीने केवळ आपला दृष्टिकोन बदलला, परंतु ग्राहकांकडून प्रचारात्मक संमती मिळवण्याच्या प्रक्रियेत पूर्णपणे सुधारणा केली नाही. यानंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने स्पाइसजेटवर १ लाखाचा दंड लावला.
