मुंबई : स्पाईसजेट विमान कंपनीच्या दर ३ विमानांमागे एका विमानाला विलंब होत आहे. सध्या स्पाईसजेट आर्थिक टंचाई आणि तांत्रिक समस्यांचा सामना करत असल्याने विमान उड्डाणांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला आहे.त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.स्पाईसजेटच्या कामगिरीत मोठी घसरण झाली आहे. जानेवारीमध्ये स्पाईसजेटच्या प्रत्येक १५ विमानांपैकी एका विमानाला दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाला होता. मे महिन्यापर्यत हा आकडा प्रत्येक सहा विमानांमागे एकावर पोहोचला आणि जुलै महिन्यात यात वाढ होऊन प्रत्येक तीन विमानांमागे एकावर आला. जवळपास प्रत्येक दुसरे विमान दोन तासांपेक्षा जास्त उशिराने उड्डाण करत आहे. देशातील चौथ्या क्रमांकाच्या या विमान कंपनीचा बाजारहिस्सा घसरुन १.२ टक्यांवर आला आहे. गेल्या पाच वर्षातील हा सर्वात कमी बाजारहिस्सा आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये स्पाइसजेटचा वक्तशीरपणा आणखी घसरला.
स्पाईसजेटच्या ४८.०५ टक्के विमानांना दोन तासांपेक्षा जास्त उशिर झाला. याशिवाय ऑगस्टमध्ये, विमान रद्द होण्याचे प्रमाणही सर्वाधिक २०.९२ टक्के होते. ऑगस्टमध्ये, भारतातील महत्वाच्या १० विमानतळांवरून स्पाईसजेटच्या प्रत्येक १०० विमानांपैकी केवळ १८ विमाने वेळेवर निघाली. त्या तुलनेत, इंडिगोची १०० पैकी ९२ विमाने, अकासा एअरची ९१ विमाने आणि एअर इंडिया समूहाची ८४ विमाने वेळेवर निघाली. स्पाईसजेटच्या ताफ्यात सध्या फक्त नऊ विमाने आहेत. यात तीन एअरबस ३२०, पाच बोईंग ७३७ आणि एक डीहॅविलँड कॅनडा डॅश ८ विमानांचा समावेश आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये देशांतर्गत प्रवाशांमध्ये स्पाईसजेटचा वाटा ७.९ टक्के होता. हा वाटा २०२३ मध्ये ४.४ टक्के, २०२४ मध्ये २.३टक्के, २०२५ मध्ये २ टक्के आणि या ऑगस्टमध्ये १.२ टक्यांपर्यंत घसरला आहे.
स्पाईसजेटने ऑगस्ट महिन्यात १,१५३ देशांतर्गत उड्डाणे केली. गेल्या वर्षी २,३३० उड्डाणे केली होती. ऑगस्ट २०२४ मधील २,७२९, २०२३ मधील ३,९९९ आणि २०२२ मधील ६,८५० उड्डाणांशी केली तर चार वर्षांत, स्पाईसजेटच्या देशांतर्गत उड्डाणांमध्ये ८३.२ टक्के घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्येही ४९ टक्के घट झाली आहे. परिचालन व्यत्ययामुळे ऑगस्टमध्ये उड्डाणे रद्द झाल्याने १८,६१८ प्रवाशांवर परिणाम झाला, तर ५२,९६१ प्रवाशांना दोन तासांपेक्षा जास्त विलंबाचा फटका बसला.
देशांतर्गत उड्डाणे घटली (ऑगस्ट)
वर्ष——संख्या———बाजारातील हिस्सा
२०२६—-१,१५३—१.२ टक्के २०२५—–२,३३०—-२ टक्के
२०२४—–२,७२९—२.३ टक्के २०२३—–३.९९९—४.४ टक्के
२०२२—-६.८५०—-७.९टक्के
स्पाईस जेट विमान कंपनी सध्या प्रचंड आर्थिक आणि परिचालनविषयक संकटाचा सामना करत असल्याने डीजीसीएने स्पाइसजेटला विशेष आर्थिक आणि परिचालनविषयक देखरेखीखाली ठेवले आहे. पिछेहाटीतून सावरण्यासाठी स्पाइसजेटने आगामी हिवाळी वेळापत्रकात २० विमाने भाडेतत्त्वावर घेण्याचा करार केला आहे. याद्वारे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान साधारण २०० हून अधिक दैनंदिन फेऱ्या वाढवून बाजारपेठेत पुन्हा पकड मिळवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
