मुंबई : वेतनाची थकबाकी मिळत नाही, तोपर्यंत ‘क्यू ४००’ विमानाचे उड्डाण करण्यास स्पाईस जेट कंपनीच्या वैमानिकांनी नकार दिला आहे. वैमानिकांच्या या निर्णयाला भारतीय विमानचालक संघटनेने पाठिंबा दिला दिल्याने स्पाईस जेट कंपनी नव्या संकटात सापडली आहे.

किफायतशीर अशी ओळख असलेली स्पाईस जेट विमान कंपनी गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक आणि कार्यात्मक अडचणींचा सामना करीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्पाईस जेटच्या कर्मचाऱ्यांना वेतनाचा प्रश्न भेडसावत आहे. एप्रिल महिन्यापासून पगार आणि भत्ते वेळेवर न मिळाल्याने वैमानिकांनी हे पाऊल उचलले आहे. वेतनविलंब, पूर्ण कर्मचारी लाभांची थकबाकी आणि कामाच्या ठिकाणी निर्माण झालेली अनिश्चितता हे प्रश्न मार्गी लागत नसल्याने ‘क्यू ४००’ विमान ताफ्याच्या वैमानिकांनी काम करण्यास नकार दिला आहे. केवळ वेतनप्रश्नच नाही तर परिचालनविषयक अडचणींशी करावा लागणारा सामना हा प्रवाशांच्या आणि हवाई वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही अधिक गंभीर विषय असल्याचेही वैमानिकांने म्हटले आहे.

विमानांशी संबंधित अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या काही पुरवठादारांची देयके थकल्याने त्यांनी सेवा देण्यास नकार दिल्याच्या तक्रारी आहेत. त्यातून उड्डाणाच्या वेळच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच कामाच्या ठिकाणी व्यवस्थापन आणि प्रवाशांकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे वैमानिकांवरील ताण वाढल्याचा दावाही संघटनेने केला. वैमानिकांनी पुकारलेल्या काम बंदमुळे अनेक देशांतर्गत उड्डाणे ऐनवेळी रद्द करावी लागत आहेत किंवा विमानांना मोठा विलंब होत आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

अनेक विमाने दुरुस्तीअभावी जमिनीवरच

फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, स्पाईस जेटच्या ताफ्यात २ ‘क्यू४००’ विमानांसह १० विमाने कार्यरत आहेत, तर ३७ विमाने ग्राउंड केलेली आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून स्पाईस जेट मोठ्या आर्थिक संकटात आहे. पैशांच्या कमतरतेमुळे कंपनीची अनेक विमाने दुरुस्तीअभावी किंवा भाडे न दिल्यामुळे जमिनीवर उभी आहेत. उपलब्ध विमानांची संख्या अत्यंत मर्यादित असल्याने, एका जरी विमानात तांत्रिक बिघाड झाला, तरी त्याचा परिणाम पुढील वेळापत्रकावर होतो आणि विमानांची साखळी उशिराने धावू लागते.

डीजीसीएचे लक्ष

स्पाईस जेटच्या घसरलेल्या कामगिरीमुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) कंपनीला ”स्पेशल वॉच” (कडक देखरेखीखाली) ठेवले आहे. सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये म्हणून तांत्रिक तपासणी कडक करण्यात आली आहे, ज्यामुळे उड्डाणांना होणाऱ्या विलंबात अधिकच भर पडत आहे.