मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) २६ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ५९ उमेदवार रिंगणार आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये देशातील १०० वर्ष जुनी असलेली डॉक्टरांची संघटना इंडिन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्रमध्ये फूट पडली असून एमएमसीच्या या निवडणुकीमध्ये आयएमएच्या नावाने तीन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत. परिणामी, ‘एक नाव… तीन पॅनेल’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातील कोणत्या पॅनेलला डॉक्टर पसंती देत आहेत याबाबत उत्सूकता वाढली आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार एमएमसीची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार नुकतेच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणाऱ्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी करून अंतिम यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये ५९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांचे पॅनेल जाहीर करण्यात आले. त्यापूर्वीच आयएमएमध्ये निवडणुकीवरून फूट पडली आणि आयएमएच्या नावाने तीन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरली. यातील एक पॅनेल हे सध्याच्या आयएमएच्या कार्यकारिणीच्या संमतीने अध्यक्षांनी जाहीर केलेले ‘अधिकृत आयएमए’ पॅनेल आहे.
या पॅनेलला निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘केंद्रीय मार्ड’, ठाणे व नवी मुंबईतील ‘मार्ड’ संघटना आणि महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशन यांनी पाठिंबा दर्शवला आहे. या पॅनेलची निवड करण्यामध्ये राजकीय पक्षांचा हस्तक्षेप असून, संघटना राजकीय पक्षाच्या दावणीला बांधण्याचा आरोप करत आयएमएच्या सर्व माजी अध्यक्षांनी एकत्रित येऊन ‘आयएमए मेंबर्स’ हे दुसरे पॅनेल, तर तरुण डॉक्टरांनी ‘युवा आयएमए’ हे तिसरे पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यामुळे ‘एक नाव आणि तीन पॅनेल’ असे चित्र एमएमसीच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे.
‘अधिकृत आयएमए’ पॅनेल हे राजकीय पाठिंब्याने उभे राहिले आहे. आयएमए ही संस्था नेहमीच अराजकीय, स्वायत्त आणि डॉक्टरांच्या हितासाठी कार्य करणारी म्हणून ओळखली जाते. राजकीय पक्षाचा पाठिंबा घेत आयएमएची स्वायत्तता धोक्यात आणली आहे. बाह्य राजकीय दबावाखाली निर्णय घेतले जात असल्याची टीका ‘आयएमए मेबर्स’चे मार्गदर्शक डॉ. सुहास पिंगळे यांनी केली.
आयएमएकडून निवडणुकीमध्ये नेहमीच मुंबई, ठाण्यातील डॉक्टरांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आयएमएच्या सदस्यावर नेहमीच अन्याय होताे. आयएमए अधिकृत हे पॅनेल अध्यक्षांनी जाहीर केले असले तरी त्यावर सरकारचा प्रभाव आहे. त्यामुळेच ‘युवा आयएमए’ हे पॅनेल निवडणुकीच्या उतरवले आहेत, असे युवा आयएमएचे सदस्य डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितले.
आयएमएच्या अधिकृत पॅनेलवर कोणताही राजकीय दबाव नाही. आयएमएच्या अधिकृत पॅनेलमध्ये नऊपैकी आठ सदस्य आयएमएचे आहेत आणि एक जागा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनला दिली आहे. नवीन लोकांना संधी मिळावी यासाठी आयएमए अध्यक्ष व महिला अध्यक्ष डॉ. मंजुषा गिरी यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही, याउलट विरोधातील पॅनेलमधील चार सदस्यांनी यापूर्वी एमएमसीवर काम केले आहे, अशी माहिती एमएमसीचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी दिली.
