मुंबई : एका यकृतातून दोन रुग्णांना नवे आयुष्य देणारी दुर्मिळ आणि अत्यंत गुंतागुंतीची स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया परळच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार पडली. ३८ वर्षांच्या ब्रेन डेड दात्याचे यकृत दोन भागांत विभागून ४४ वर्षीय रुग्ण आणि तीन वर्षांच्या बालरुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आले. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे दोन्ही कुटुंबांना आशेचा नवा किरण मिळाला.

सायन येथील नेताजी (४४) हे दीर्घकाळापासून एंड-स्टेज लिव्हर डिसीजने त्रस्त होते. त्यांना पोटात पाणी साचणे, कावीळची लक्षणं होती आणि स्नायु कमजोर होण्यासारख्या गंभीर समस्या सतावत होत्या. १ एप्रिल २०२१ पासून हा रुग्ण दात्याच्या प्रतीक्षेत होते. रुग्णांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती.नेरुळ येथील तीन वर्षीय चार्विक हा दुर्मिळ अशा क्रिप्टोजेनिक सिरोसिस या लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या यकृताच्या आजाराने पिडीत होता. या आजारामुळे त्याची वाढ खुंटली होती आणि पोटात द्रव साचल्यामुळे त्याला प्रचंड सूज येत होती. सीटी स्कॅनद्वारे या स्थितीचे निदान होताच १२ डिसेंबर २०२५ पासून या बालरुग्णाला प्रतीक्षा यादीत समाविष्ट करण्यात आले. त्याच्यासाठी यकृत प्रत्यारोपण हा lएकमेव उपचार पर्याय होता.

डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात ३८ वर्षीय व्यक्ती ही मेंदूमृत घोषित झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या रुग्णालयात केवळ किडनी प्रत्यारोपणाची सुविधा असल्याने, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच यकृताची स्थिती चांगली असल्याने ग्लेनईगल्स हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती डॉ. अनुराग श्रीमल(संचालक – यकृत प्रत्यारोपण) यांनी दिली.९ फेब्रुवारी २०२५ रोजी दात्याचे यकृत दोन भागांत विभागण्यात आले. मोठा राइट ट्रायसेक्शन भाग प्रौढ रुग्णासाठी आणि छोटा लेफ्ट लेटरल सेगमेंट हा बालरुग्णासाठी वापरण्यात आला असेही डॉ श्रीमल यांनी स्पष्ट केले.

ही प्रत्यारोपण प्रक्रिया सुमारे १५ ते १७ तास चालली. अत्यंत काटेकोर नियोजन, तज्ज्ञ शल्यचिकित्सकांची टिम, अॅनेस्थेशिया टिम आणि क्रिटिकल केअर टीममधील समन्वयामुळे ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.शस्त्रक्रियेनंतर दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा दिसून येत असून लवकरच ते दैनंदिन आयुष्यास सुरुवात करतील असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला.

झेडटीसीसीचे डॉ. एस.के. माथूर(अध्यक्ष, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर) सांगतात की, बालरुग्णांसाठी योग्य आकाराचे यकृत मिळणे कठीण असते. त्यामुळे परदेशात वापरल्या जाणाऱ्या स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट पद्धतीमुळे एका दात्याच्या यकृतातून दोन रुग्णांना जीवदान देता येते. भारतात ही पद्धत अजूनही क्वचितच वापरली जाते. याबाबत सीईओ डॉ. बिपिन चेवले सांगतात कीअवयव दात्याच्या कुटुंबाच्या निःस्वार्थ निर्णयामुळे एकाच वेळी दोन रुग्णांना जगण्याची नवी संधी मिळाली आहे. प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेले रुग्ण आणि उपलब्ध दात्याच्या अवयवांमधील दरी भरून काढण्यासाठी अवयवदानाबाबत जनजागृती वाढविणे गरजेचे आहे.