तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय

मुंबई : मुंबईत करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका सज्ज झाली असून ही लाट रोखण्यासाठी मुंबईत पुन्हा सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आरोग्य केंद्रे, दवाखाने, सार्वजनिक शौचालये, झोपडपट्टय़ा, चाळी आणि अरुंद गल्ल्यांमध्ये फवारणी करून त्या र्निजतूक करण्याचा पालिकेचा मानस आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ही फवारणी करण्यात येणार आहे.

करोनाच्या तिसऱ्या लाटेत झोपडपट्टय़ांमध्ये संसर्गाचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पालिका दक्ष झाली असून झोपडपट्टय़ा, दाटीवाटीने उभ्या असलेल्या चाळी, अरुंद गल्ल्या, सार्वजनिक शौचालये, आरोग्य केंद्रे, दवाखाने आदी ठिकाणी सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करून र्निजतुकीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मुंबईत मार्च २०२० मध्ये करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर पालिकेने झोपडपट्टय़ा आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी केली होती. मात्र संसर्गाचे प्रमाण कमी होताच फवारणी थांबविण्यात आली होती. आता सावधगिरीचा एक भाग म्हणून पुन्हा मुंबईत फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.

पालिकेच्या कुर्ला येथील ‘एल’ विभाग कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन विभागाने सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्यासाठी अशासकीय संस्थांना अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. सहा महिने फवारणी करण्याचा अनुभव असणाऱ्या संस्थेची या कामासाठी निवड करण्यात येणार आहे. अशासकीय संस्थांना ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आली आहे. पात्र संस्थांची सोडत पद्धतीने या कामासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

या कामासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या संस्थेच्या कामगारांमार्फत फवारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी कामगारांची निवड प्रक्रियाही राबविण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वप्रथम कुर्ला परिसरात  फवारणी करण्यात येणार आहे.