मुंबई : मुंबईतील झोपडीधारकांची पात्रता निश्चिती योग्य प्रकारे आणि पारदर्शकपणे व्हावी यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०१६ मध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली. हे सर्वेक्षण आतापर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते.
मात्र आतापर्यंत दहा वर्षांत केवळ सहा लाख २३ हजार ५१४ झोपडीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. अद्यापही तब्बल सात लाख ५५ हजार ५७२ झोपडीधारकांचे सर्वेक्षण बाकी आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै २०२५ मध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे काम डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतरही झोपु प्राधिकरणाने कामास वेग दिला नसून आजही सात लाखांहून अधिक झोपडीधारकांचे सर्वेक्षण शिल्लक आहे.
मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेऊन झोपु प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रकल्प राबविले जात आहेत. या झोपु योजनेअंतर्गत पुनर्वसित इमारतीत हक्काचे घर मिळविण्यासाठी झोपडीधारकांची पात्रता निश्चिती करून त्यांचे नाव परिशिष्ट-२ मध्ये समाविष्ट होणे आवश्यक असते.
मात्र पात्रता निश्चितीत मानवी हस्तक्षेप असून त्यात अनेक गैरप्रकार होत असल्याचा तसेच घरे लाटली जात असल्याचे आरोप होतात. त्यामुळे पात्रता निश्चिती पारदर्शकपणे करण्यासाठी झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय झोपु प्राधिकरणाने २०१६ मध्ये घेतला. त्यानंतर मुंबईतील सर्वच्या सर्व २६१४ झोपडपट्ट्यांतील झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यासाठी सुरुवातीला १० लाख ८७ हजारांहून अधिक झोपड्यांचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले.
या ड्रोन सर्वेक्षणानुसार मुंबईतील १३ लाख ७९ हजार ०८६ झोपडीधारकांचे सर्वेक्षण करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार झोपु प्राधिकरणाने प्रत्यक्ष बायोमेट्रिक सर्वेक्षणास सुरुवात केली. हे बायोमेट्रिक सर्वेक्षण आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झालेले नसून हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी किती वेळ लागणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.
झोपु प्राधिकरणाकडून २०१६ ते २४ जुलै २०२५ पर्यंत १३ लाख ७९ हजार ०८६ झोपड्यांपैकी ८ लाख २२ हजार ८४३ झोपड्यांचे क्रमांकन पूर्ण झाले होते. तर यातील ५ लाख ७५ हजार १३६ झोपड्यांमधील झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले होते. यावेळी ५ लाख ५६ हजार २४३ झोपड्यांचे क्रमांकन तर ८ लाख ३ हजार ९५० झोपड्यांमधील झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण शिल्लक होते.
दरम्यान, २०१६ ते जुलै २०२५ या कालावधीत केवळ ४१.७० टक्के सर्वेक्षण पूर्ण करण्यात झोपु प्राधिकरणाला यश आले होते. सर्वेक्षणाची ही संथगती पाहता मुख्यमंत्र्यांनी कामाला गती देत डिसेंबर २०२५ पर्यंत सर्वेक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण करण्याचे आदेश झोपु प्राधिकरणास जुलै २०२५ मध्ये दिले होते. या आदेशानंतर बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठीचे मनुष्यबळ वाढवित कामाला वेग दिल्याचे झोपु प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कामाने वेग घेतला नसल्याचे चित्र आहे. कारण मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सर्वेक्षण पूर्ण झाले नाहीच, पण अद्यापही सात लाखांहून अधिक झोपडीधारकांचे सर्वेक्षण शिल्लक आहे.
झोपु प्राधिकरणातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १३ लाख ७८ हजार ०८६ झोपड्यांपैकी २० मार्च २०२६ पर्यंत नऊ लाख १ हजार ०४३ झोपड्यांचे क्रमांकन पूर्ण झाले आहे. तर सहा लाख २३ हजार ५१४ झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. अद्यापही चार लाख ७८ हजार ०४३ झोपड्यांचे क्रमांकन आणि सात लाख ५५ हजार ५७२ झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण होणे बाकी आहे. झोपु प्राधिकरणाचा हा सर्वेक्षणाचा वेग पाहता सात लाखांहून अधिक झोपडीधारकांचे सर्वेक्षण केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
