मुंबई : मुंबईत खासगी ट्रस्टच्या मालकीच्या जागांवर मोठ्या संख्येने झोपड्या असून, त्यांच्या पुनर्विकासाचे काम रखडले आहे. ट्रस्टचे मालक आणि जमीनधारक पुनर्विकासासाठी पुढे येत नसल्याने झोपडपट्टी पुनर्वसन रखडले असून, झोपडीधारकांची प्रतीक्षा लांबली आहे. मात्र, आता सुमारे ४३७ एकर जागेवरील झोपड्यांचे पुनर्वसन लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. या जागांवरील झोपु योजना मार्गी लावण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (झोपु प्राधिकरण) ठोस पाऊल उचलले आहे. त्यानुसार, जमीनधारकांना नोटिसा बजावण्यात येणार असून नोटिशीनुसार ६० दिवसांत जमीनधारकांनी पुनर्वसन योजनेचा प्रस्ताव सादर करणे आवश्यक असेल. तसे न झाल्यास सुनावणी घेऊन संबंधित जागा झोपडपट्टी म्हणून घोषित केली जाईल. त्यानंतर भूसंपादन करून झोपु योजना मार्गी लावली जाईल. झोपु प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे ४३७ एकरांवरील झोपडीधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्यासाठी झोपु प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध झोपु योजना राबविल्या जात आहेत. मात्र, मुंबईतील मोठ्या संख्येने झोपड्यांचे पुनर्वसन अद्याप बाकी आहे. हे पुनर्वसन लवकरात लवकर पूर्ण करून मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दिष्ट झोपु प्राधिकरणाने ठेवले आहे. असे असताना मुंबईतील खासगी ट्रस्टच्या मालकीच्या जागांवरील झोपड्यांचे पुनर्वसन मात्र वर्षानुवर्षे रखडले आहे.
भांडूप खोत ट्रस्टच्या मालकीच्या जागेपैकी, बायरामजी जीजीभॉय यांच्या मालकीच्या जागेपैकी, एफ. ई. दिनशॉ यांच्या मालकीच्या जागेपैकी, गोदरेजच्या मालकीच्या जागेपैकी, कांजूर खोत ट्रस्टच्या मालकीच्या जागेपैकी, कुर्ला इस्टेटच्या मालकीच्या जागेपैकी, वाडिया यांच्या मालकीच्या जागेपैकी, तसेच आणखी एका ट्रस्टच्या मालकीच्या जागेपैकी एकूण ४३७ एकर जागेवर झोपड्या आहेत. या जागांवरील झोपड्यांचे पुनर्वसन मार्गी लावण्यासाठी २०१५ मध्ये झोपु प्राधिकरणाने ट्रस्टच्या मालकांना नोटिसा बजावून ३० दिवसांत पुनर्वसन योजनेचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. निर्धारित मुदतीत जमीनधारक पुढे न आल्यास संबंधित जागा झोपडपट्टी म्हणून घोषित करून, तिचे संपादन करत प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार नोटिसाही बजावण्यात आल्या. मात्र, ट्रस्टच्या मालकांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले. त्यावेळी न्यायालयाने संबंधित ट्रस्टच्या मालकांना संधी देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, झोपु प्राधिकरणाने प्रस्ताव सादर करण्यासाठी १२० दिवसांची मुदत दिली. मात्र, दहा वर्षे उलटूनही जमीनमालक पुढे आलेले नाहीत. त्यामुळे ४३७ एकरांवरील हजारो झोपडीधारकांचे पुनर्वसन रखडले आहे.
खासगी ट्रस्टच्या जागांवरील रखडलेले पुनर्वसन मार्गी लावण्यासाठी आता झोपु प्राधिकरणाकडून संबंधित ट्रस्टना पुन्हा नोटिसा बजावण्यात येणार आहेत. तसेच, प्रस्ताव सादर करण्यासाठी आणि त्यानंतरची सुनावणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी असलेली १२० दिवसांची मुदत कमी करून ६० दिवस करण्यात आली आहे. या मुदतीत संबंधितांनी झोपु योजनेचा प्रस्ताव सादर न केल्यास सुनावणी घेऊन झोपड्यांनी व्यापलेली जागा झोपडपट्टी म्हणून घोषित केली जाईल. त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून झोपु योजना मार्गी लावली जाईल, अशी माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.या प्रक्रिया पूर्ण करून एकेक प्रकल्प मार्गी लावला जाणार आहे. त्यामुळे ४३७ एकरांवरील झोपड्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
