मुंबई: मुंबईत मोठ्या संख्येने राबवल्या जाणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील रहिवाशांना पात्रता निश्चितीपासून ते विकासकांकडून घरभाडे न मिळणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. पण यानंतर झोपडीधारकांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी झोपु प्राधिकरणाच्या कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. झोपु प्राधिकरण झोपडीधारकांच्या दारी येणार आहे.
झोपडीधारकांच्या समस्यांचे योग्यप्रकारे आणि तातडीने निराकरण करण्यासाठी झोपु प्राधिकरणाने आता समस्या निराकरण शिबिराची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार यापुढे मुंबईभर अशी शिबिरे घेतली जाणार असून त्याद्वारे झोपडीधारकांच्या समस्यांचे निराकरण केले जाणार आहे. झोपडीधारकांच्या सर्व प्रकारच्या समस्यांचे एकाच ठिकाणी योग्यप्रकारे आणि तातडीने निराकरण करण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणी समस्या निराकरण शिबिर घेण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
ही शिबिरे कुठे-कुठे, केव्हा घ्यायची यासंबंधीचे नियोजन सध्या सुरू आहे. नियोजन पूर्ण झाल्यानंतर झोपु प्राधिकरणाकडून शिबिराचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर प्राधिकरणाने नुकतेच बोरिवलीमध्ये पहिले शिबिर आयोजित केले होते. दिडशेहून अधिक झोपडीधारक सहभागी बोरिवलीतील अटल स्मृती उद्यान येथे रविवारी सकाळी ९ वाजता पहिले समस्या निराकरण शिबिर घेण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल, आमदार संजय उपाध्याय, झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर उपस्थित होते.
झोपु प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित झोपडीधारकांच्या समस्या ऐकून घेतल्या. पात्रता निश्चिती, थकीत भाडे, सदनिकांच्या वाटपास होत असलेला विलंब, प्रकल्प पूर्णत्वास होणार विलंब, कामाच्या दर्जाबाबत प्रश्न अशा अनेक प्रकारच्या समस्या यावेळी झोपडीधारकांकडून मांडण्यात आल्या. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी तिथल्या तिथे कागदपत्रांची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तिथल्या तिथे मार्गी लावणारे प्रश्न निकाली काढण्यात आले.
गुंतागुंतीच्या प्रकरणांवर लवकरच सुनावणी घेण्याचे संबंधित झोपडीधारकांना आश्वासित करण्यात आले आहे. दीडशेहून अधिक झोपडीधारकांनी यावेळी आपल्या समस्या मांडल्या. पहिले शिबिर यशस्वी ठरले असून आता पुढे नियमितपणे मुंबईतील विविध ठिकाणी अशी शिबिरे आयोजित करून झोपडीधारकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव दत्तात्रय नवले यांनी दिली. तेव्हा थकीत घरभाडे, पात्रता निश्चिती, घरांचा दर्जा, प्रकल्पास विलंब, सदनिकांच्या ताब्यास विलंब वा इतर कोणतेही प्रश्न असतील तर झोपडीधारकांना या शिबिरात सहभागी होत आपले प्रश्न सोडविण्याची एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे.
