Rajbhavan SRPF Jawan Suicide: मुंबईतील राजभवनात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसआरपीएफच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची गंभीर घटना घडली आहे. कोल्हापूरच्या एसआरपीएफ गट क्रमांक १६ मध्ये कार्यरत असलेले कौस्तुभ सांगळे गेल्या काही दिवसांपासून राजभवनात बंदोबस्तासाठी तैनात होते. मात्र सोमवारी रात्री त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. यानंतर पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून घटनास्थळी सुसाइड नोट आढळून आली आहे. सांगळेंनी टोकाचे पाऊल उचलण्यामागे कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली, याचाही तपास केला जात आहे.
टाइम्स नाऊने दिलेल्या बातमीनुसार, सांगळे सोमवारी राजभवनाच्या टॉवर क्र. २ वर सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत बंदोबस्तावर तैनात होते. दर तीन तासांनी एसआरपीएफच्या जवानांची शिफ्ट बदलते. सांगळे यांची ९ वाजता ड्युटी संपल्यानंतर ते त्यांच्या खोलीत परतले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
आत्महत्या करण्याची आगाऊ धमकी
सांगळे यांनी आत्महत्या केल्यानंतर मलबार हिल पोलीस ठाण्याला याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रायफल ताब्यात घेऊन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली. पोलीस उपायुक्त रागसुधा आर. यांनी सांगितले, वैयक्तिक कारणामुळे सांगळे यांनी हे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. त्यांच्या खोलीतून सुसाइड नोट प्राप्त झाली असून त्याची तपासणी केली जात आहे.
कौस्तुभ सांगळे कोण आहेत?
कौस्तुभ सांगळे हे २०२४ च्या बॅचचे राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहेत. प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांची नेमणूक १० जून रोजी मुंबईतील राजभवनात (आता लोकभवन) करण्यात आली होती.
प्रेमसंबंधातून तणाव निर्माण झाल्याचा दावा
तपासकर्ते प्रेमसंबंधाच्या अंगानेही तपास करत आहेत. सांगळे यांचे पोलीस खात्यातीलच एका महिलेशी संबंध होते. दोघेही लग्न करण्याचा विचार करत होते. मात्र मुलीच्या घरच्यांनी तिचे लग्न इतर ठिकाणी ठरविल्यानंतर सांगळे भावनिकदृष्ट्या तणावात असल्याची माहिती दिली जात आहे.
सूत्रांनी टाइम्सनाऊला दिलेल्या माहितीनुसार, या कारणावरून सांगळे यांनी सदर महिलेला आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली होती. याची माहिती महिलेने तिच्या स्थानिक पोलीस ठाण्यातही दिली होती.
कौटुंबिक पार्श्वभूमीत तणाव
पोलिसांनी सांगळे यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचाही धांडोळा घेतला. सांगळे लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले होते. यानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले. त्यांना दोन बहिणी आहेत. त्यापैकी एका बहिणीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. तर दुसरीचे लग्न झाले आहे. कुटुंबात दुःख भोगल्यानंतर आता वैयक्तिक आयुष्यातील नातेसंबंधातही नैराश्य आल्यामुळे सांगळे यांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाला का? याचाही तपास केला जात आहे.
