मुंबई : इयत्ता दहावीच्या निकालात यंदा घसरण झाली असली तरी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. मात्र ८५ ते ९० तसेच ७५ ते ८५ टक्के गटातील विद्यार्थ्यांची संख्येत घट झाल्याने मध्यम श्रेणीतील महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये चुरस काहीशी कमी दिसून येणार आहे.
राज्य मंडळाच्या आकडेवारीनुसार ९० टक्क्यांवरील विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षीच्या १३ हजार ४३० वरून यंदा १३ हजार ५९१ इतकी झाली आहे. त्यामुळे मुंबईतील रुपारेल, साठ्ये, केसी, एचआर, झेवियर्स, मिठीबाई, रुईया, पोद्दार, हिंदुजा, कीर्ति आदी नामांकित महाविद्यालयांतील पहिल्या गुणवत्ता यादीत यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष कायम राहणार आहे.
त्याचवेळी ८५ ते ९० टक्के गटातील विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार १७ ने घटली असून ८० ते ८५ टक्के गटातही ३ हजार २१८ विद्यार्थ्यांची घट झाली आहे. ७५ ते ८० टक्के गटातील विद्यार्थ्यांची संख्याही २ हजार ५४३ ने कमी झाली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी ८५ ते ९० टक्क्यांवर बंद झालेल्या अनेक महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये यंदा १ ते ३ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, असा अंदाज शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
४५ टक्क्यांवरील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ
यंदाच्या निकालात ४५ टक्क्यांखालील विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ४ हजार २६८ ने वाढली आहे. परिणामी, मध्यम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्यावर्षीपेक्षा पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची संधी वाढू शकते. सीबीएसई आणि आयसीएसई मंडळांचे निकालही चांगले लागल्याने मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी प्रवेशात तिन्ही मंडळांतील विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
विशेषतः विज्ञान शाखेसाठीची चढाओढ कायम राहण्याची शक्यता असून वाणिज्य शाखेच्या तुलनेत कला आणि विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल यंदाही कायम राहणार असल्याचे महाविद्यालयांकडून सांगण्यात येत आहे.
विज्ञान आणि कला शाखेचे कट ऑफ वाढण्याची शक्यता
गतवर्षी अनेक नामांकित महाविद्यालयांचे विज्ञान आणि कला शाखेचे कटऑफ ९४ ते ९५ टक्क्यांदरम्यान गेले होते. यंदा टॉपर्सची संख्या कायम असल्याने पहिल्या गुणवत्ता यादीत फार मोठी घसरण होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीत काहीसा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मागील वर्षांच्या कटऑफचा अभ्यास करूनच महाविद्यालयांचे पर्याय निवडावेत, असा सल्ला प्राचार्यांकडून दिला जात आहे.
