मुंबई : स्टेट ट्रान्सपोर्ट को – ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये तब्बल २३.९७ कोटी रुपयांच्या फर्निचर दुरुस्ती व अंतर्गत सजावटीच्या कामाशी संबंधित तीन महत्त्वाच्या निविदांचा दस्तावेज गहाळ झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे. हा केवळ निष्काळजीपणाचा प्रकार नसून, आर्थिक गैरव्यवहार लपवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (इओडब्ल्यू) सहपोलीस आयुक्तांकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली असून, संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
राज्यभरातील बँकेच्या ४० शाखांमध्ये फर्निचर दुरुस्ती आणि अंतर्गत सजावटीच्या कामांसाठी निविदा क्रमांक १३/२५-२६ अंतर्गत प्रक्रिया राबविण्यात आली होती. हा निविदा करारचे एकूण २३ कोटी ९६ लाख ८१ हजार ६८५ रुपयांचा होता. या कामांसाठी निवड झालेल्या विक्रेत्यांमध्ये रत्ना शीतल पॅनेल्स प्रा. लिमि.चा समावेश असून, या करारात १०० टक्के आगाऊ रक्कम देण्याची तरतूद असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
कोणता दस्तावेज गहाळ ?
प्रकल्प १ – १६.७० कोटी रुपये – दस्तावेज अंशतः उपलब्ध
प्रकल्प २ – ३.३४ कोटी रुपये – दस्तावेज पूर्णपणे गहाळ
प्रकल्प ३ – ३.९२ कोटी रुपये – दस्तावेज पूर्णपणे गहाळ
एकूण – २३.९७ कोटी रुपये – तीन दस्तावेजावर प्रश्नचिन्ह
निविदेतील महत्त्वाची कागदपत्रही गायब
तक्रारीनुसार, निविदा उघडण्याची तारीख २ सप्टेंबर २०२५ होती. मात्र, वृत्तपत्रातील निविदा जाहिरात, खरेदी आदेशांचे तपशील आणि इतर महत्त्वाचे संदर्भ कागदपत्रे उपलब्ध नाहीत. इतक्या मोठ्या रकमेच्या निविदांशी संबंधित दस्तावेज गहाळ होणे किंवा त्यातील कागदपत्रे गायब होणे हे गंभीर स्वरूपाचे असून, त्यामागील जबाबदार अधिकारी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी होणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.
ईओडब्ल्यू चौकशीची मागणी
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने आर्थिक गुन्हे शाखेने तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू करून दस्तऐवज गायब होण्यामागील कारणांचा शोध घ्यावा. तसेच दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
