मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने यावर्षी आषाढी विशेष फेऱ्यांमधून सुमारे साडेनऊ लाख भाविकांनी प्रवास करत वारी पूर्ण केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यात्रेसाठी सुमारे ६ टक्के अधिक बस उपलब्ध करून देण्यात आल्या. पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी एसटीने राज्यभरातून विशेष बससेवा उपलब्ध करून दिली होती. वाढती मागणी लक्षात घेऊन बसफेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली. मात्र, बससंख्या वाढवली तरी प्रवास करणाऱ्या भाविकांच्या संख्येत सुमारे ५ टक्क्यांची घट झाल्याचे समोर आले आहे.

आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी यंदा एसटी महामंडळाच्या सुमारे ५,५०० विशेष बस सेवेत दाखल करण्यात आल्या. या बसच्या २१,५२७ फेऱ्यांमधून सुमारे ९,२४,७३८ भाविकांनी प्रवास केला. गेल्यावर्षी आषाढी यात्रेनिमित्त एसटीच्या ५,२०० बसची व्यवस्था होती. दोन वर्षाच्या तुलनेत सुमारे ६ टक्क्यांनी बसच्या संख्येत वाढ झाली. या बसच्या २१,४९९ फेऱ्यांमधून ९,७१,६८३ भाविक आणि प्रवाशांनी प्रवास केला होता. म्हणजेच फेऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी प्रवाशांच्या संख्येत सुमारे ४.८३ टक्क्यांची म्हणजेच ४६,९४५ प्रवाशांची घट झाली आहे.

प्रवासी घटले, महसुलात वाढ

एसटी महामंडळाद्वारे दरवर्षी आषाढी यात्रेसाठी जादा बस सोडल्या जातात. वर्ष २०२४ मध्ये पाच हजार बस चालवण्यात आल्या. या बसद्वारे १९ हजार १८६ फेऱ्या चालवण्यात आल्या. तर, ९ लाख ५३ हजार भाविकांनी सुरक्षित प्रवास केला. म्हणजेच वर्ष २०२६ च्या तुलनेत सुमारे २८ हजार प्रवाशांची घट दाखवण्यात आली. या यात्रेमधून एसटी महामंडळाला वर्ष २०२४ मध्ये २८ कोटी ९१ लाख ५८ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले होते. तर, वर्ष २०२५ मध्ये ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये ६ कोटी ९६ लाख ३ हजार रुपयांचे उत्पन्न वाढले. तर, वर्ष २०२६ मध्ये एसटी महामंडळाला ४१ कोटी १८ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. यावर्षी उत्पन्नात सुमारे ५ कोटी ३० लाख रुपयांची वाढ झाली.

तिकीट दरात वाढ केल्याने महसूल वाढला

एसटी महामंडळाने उन्हाळी गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन साध्या बसगाड्यांच्या भाड्यात तात्पुरती १० टक्के वाढ लागू केली होती. ही भाडेवाढ १५ एप्रिल ते १५ जून २०२६ या कालावधीत लागू राहणार होती. परंतु, या भाडेवाढीची मुदत १५ जुलै रोजीपर्यंत वाढवली. मात्र, एसटीचा वाढता तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने ही भाडेवाढ ३१ जुलैपर्यंत कायम केली. मात्र, एसटी महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी, १७ जुलै रोजी तात्पुरती १० टक्के वाढीचा निर्णय स्थगित केला. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यात १३.५६ टक्के वाढ केली. त्यामुळे महसुलात वाढ झाल्याचे दिसून येते.

खासगी वाहनांचा वाढता वापर

पर्यायी प्रवासाची साधने, नादुरुस्त एसटी बस, तसेच काही भागांतील बदललेले प्रवासाचे नियोजन यामुळे एसटीच्या बसने प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली असावी. एसटी महामंडळाद्वारे यात्रेसाठी बससेवा सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला होता. मात्र, बससंख्या वाढवली तरीही प्रवासी संख्या कमी झाली. याबाबत एसटी महामंडळाने भविष्यातील नियोजनाचा विचारपूर्वक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे मत परिवहन क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.