मुंबई : राज्य परिवहन (एसटी)च्या प्रवासभाड्यातील सवलतींचा लाभ मिळविण्यासाठी पात्र प्रवाशांनी राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड (एनसीएमसी) नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. विशेषतः महिला प्रवाशांची नोंदणी नोव्हेंबरअखेर पूर्ण करण्यासाठी महामंडळाने प्रयत्न सुरू केले असून, ग्रामीण भागातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शासनाच्या निर्णयानुसार एसटीच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या पात्र प्रवाशांना एनसीएमसी कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी एसटी आगार, बसस्थानके आणि प्रवाशांच्या सोयीच्या ठिकाणी अधिकृत एजन्सीमार्फत नोंदणी व कार्ड वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही प्रक्रिया सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सुरू असते.

महिला प्रवाशांना सवलतीचा लाभ घेताना अडचणी येऊ नयेत, यासाठी कार्ड नोंदणीला गती देण्यावर महामंडळाने भर दिला आहे. ग्रामीण भागातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्यापर्यंतही ही सुविधा पोहोचविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयांच्या माध्यमातून विशेष नोंदणी व वितरण शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अंगणवाडी सेविका, आशा सेविका, गृहिणी आणि नोकरदार महिलांसह सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी सुलभ व्हावी, यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिबिरांचे आयोजन करण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी एसटीच्या विभागीय कार्यालयाशी किंवा आगार प्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

एसटीच्या सवलत योजनांचा लाभ पात्र प्रवाशांना सुलभपणे मिळावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे पात्र प्रवाशांनी विलंब न करता एनसीएमसी कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

एसटी महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांना शासन निर्देशानुसार सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. त्यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतीचा समावेश आहे. या सवलतीच्या प्रवासाचे अधिक सुलभ व डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी एनसीएमसी कार्ड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. सवलतीचा प्रवास अधिक पारदर्शक, डिजिटल व सुलभ करण्याच्या दृष्टीने एनसीएमसी कार्ड प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार असून, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी नोव्हेंबरपर्यंत एनसीएमसी कार्ड नोंदणी करून घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.