मुंबई : एसटी महामंडळातील अधिकारी पदस्थापनेवरून प्रशासकीय कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विभाग नियंत्रक पदाच्या सुमारे आठ जागा रिक्त असताना, नियोजन व पणन विभागातील ‘नियोजन अधिकारी’ पदावर करण्यात आलेल्या नियुक्तीच्या निष्पक्ष चौकशीची मागणी परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्याकडे दलित महासंघाचे कडेगाव तालुका अध्यक्ष दीपक वाघमारे यांनी केली आहे.
तक्रार अर्जानुसार, नियोजन अधिकारी हे पद मागील सुमारे सात वर्षांपासून रिक्त होते. त्यामुळे अशा रिक्त पदावर केवळ संबंधित अधिकाऱ्याची सोय व्हावी यासाठी बदली करणे योग्य होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विभाग नियंत्रक पदाच्या रिक्त जागा व महामंडळाची प्रशासकीय गरज लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली होती का, असा सवालदेखील उपस्थित करण्यात आला आहे. संबंधित पदस्थापना कोणत्या नियमांनुसार व प्रशासकीय निकषांवर करण्यात आली, तसेच समान स्थितीतील अन्य अधिकाऱ्यांना अशाच संधी देण्यात आल्या असत्या का, याची चौकशी करण्याची मागणी तक्रारदार दीपक वाघमारे यांनी केली आहे.
निर्णयप्रक्रियेत नियमबाह्य कार्यपद्धती वा अधिकारांचा अनुचित वापर आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी केली आहे.या तक्रारीमुळे विशिष्ट अधिकाऱ्यांवर मेहरबानी करण्यासाठी महामंडळातील पदस्थापना धोरण, प्रशासकीय पारदर्शकता व समान संधी यांना तिलांजली दिली जाते का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
प्रकरण काय?
नियोजन व पणन विभागामध्ये ”नियोजन अधिकारी” हे सांख्यिकी शाखेशी संबंधित असून, मागील सुमारे सात वर्षांपासून ते पद रिक्त होते. तसेच महामंडळाच्या सद्य प्रशासकीय गरजेच्या दृष्टीने या पदाची आवश्यकता नसल्यामुळे ते दीर्घकाळ रिक्त ठेवण्यात आले होते. मात्र एक अधिकारी विभाग नियंत्रक या पदावर कार्यरत असताना त्यांच्या विनंतीनुसार नियोजन व पणन विभागामध्ये नियोजन अधिकारी या पदावर सांख्यिकी विभागातील अधिकारी उपलब्ध असताना त्यांना डावलून ही नियुक्ती केली आहे, अशी तक्रार आहे. या तक्रारीबाबत अहवाल मागविला आहे. अहवाल आल्यानंतरयोग्य ती कारवाई करण्यात येईल. -प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
