मुंबई : दिवाळीत गर्दीच्या काळात एसटीच्या प्रवासी भाड्यात १५ टक्के हंगामी वाढ करण्याचा राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीतील प्रस्तावित भाडेवाढ टळली. दुष्काळ व महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.
दिवाळीनिमित्त एसटीच्या गाड्यांना मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी असते. या पार्श्वभूमीवर दरवर्षी हंगामी भाडेवाढ केली जाते. यावर्षीही १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत प्रवासी भाड्यात सरसकट १५ टक्के वाढ करण्याचा एसटी महामंडळाचा प्रस्ताव होता. मात्र, आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणे योग्य नसल्याचे हा प्रस्ताव रद्द करण्यात आला.
एसटीची लालपरी ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, नोकरदार व ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांसह महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चात भाडेवाढीमुळे भर पडली असती. त्यामुळे प्रवाशांना दिलासा देण्याच्या भूमिकेतून एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
एसटी आर्थिक तोट्यात असून, त्याचा भार सर्वसामान्य प्रवाशांवर दुष्काळाच्या स्थितीत टाकणे अयोग्य ठरेल. एसटीच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पर्यायी उपाययोजना शोधण्याची गरज असून, परवडणारी व विश्वासार्ह प्रवासी सेवा उपलब्ध करून देणे हे महामंडळाचे कर्तव्य आहे. एसटी महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागत असताना हंगामी भाडेवाढ नाकारल्याने महसुलाच्या दृष्टीने महामंडळापुढील आव्हान कायम राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांवर अतिरिक्त भार न टाकता आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महामंडळ कोणत्या उपाययोजना करते, याकडे लक्ष लागले आहे.
महसुलावर पाणी?
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला मागील काही महिन्यात ऐतिहासिक तोटा सहन करावा लागला. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यात जुलै २०२६ मध्ये १३.५६ टक्के वाढ केली. मात्र, गणेशोत्सव काळात अतिरिक्त ३० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. परंतु, कोकणवासीयांच्या रोषानंतर भाडेवाढीचा निर्णय मागे घेण्यात आला. तर, आता ऐन दिवाळीत १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. परंतु, या कालावधीत एसटी महामंडळाला ऐतिहासिक महसूल मिळतो. तो यावर्षी मिळेल की नाही, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
