सात कर्मचाऱ्यांची सुटका; चिपळूण आगाराचे मोठे नुकसान, २१ बसगाड्या पाण्यात
मुंबई : चिपळूणला पुराचा वेढा पडल्यानंतर त्यातून एसटीचे आगाराही सुटू शकले नाही. पाणी वाढण्याचा धोका पाहता अनेक गाड्या अन्य ठिकाणी स्थलांतरित करणे, आगारातील सामान सुरक्षित स्थळी हलवणे इत्यादी कामे पार पाडताना पाण्याची पातळी बघता बघता वाढली आणि एसटीच्या सात कर्मचाऱ्यांना जीव वाचविण्यासाठी एसटीच्या टपावर नऊ तास काढावे लागले.  नऊ तासांनी  त्यांची पोलिसांनी सुटका के ली. या पुरात चिपळूण आगाराचेही मोठे नुकसान झाले.

एसटीच्या टपावर नऊ तास काढलेल्या सात कर्मचाऱ्यांमध्ये आगाराचे व्यवस्थापक रणजित राजेशर्के  हेही होते. आगारात पाणी भरत असल्याची माहिती आगाराच्या सुरक्षा रक्षकांनी पहाटेच्या सुमारास शिर्के  यांना भ्रमणध्वनीवर दिली आणि त्यांनी तात्काळ गुरुवारी पहाटे पावणेचार वाजता आगार गाठले. आगारात एकूण ११० गाड्या असतात. आदल्या दिवशी काही गाड्या अन्यत्र हलवण्यात आल्या. तर काही गाड्या पहाटे येऊन चालकांच्या मदतीने बाहेर काढल्या. फक्त २१ गाड्याच आगारात होत्या. त्याही आगारातील थोड्या उंचीच्या ठिकाणी,तर काही गाड्या आगारातील कार्यशाळेजवळ उभ्या केल्या. तसेच अन्य काही वस्तूही दुसरीकडे हलविल्या. तोपर्यंत पाहता-पाहता पाण्याची पातळी वाढू लागली. आगारातील मोजके  कर्मचारी आधीच बाहेर पडले होते. पाण्याची पातळी वाढू लागल्याने जीव वाचविण्यासाठी आगार व्यवस्थापक राजेशिर्के , एक सुरक्षा रक्षक आणि आणखी पाच कर्मचारी कार्यशाळेतील एसटीच्या टपावर चढले.

शिर्के  यांनी सांगितले की, बघता-बघता पाण्याची पातळी १२ ते १४ फुटांपर्यंत वाढली आणि आम्हाला धडकी भरली. आगारातील सामानाही डोळ्यादेखल वाहून जाताना वाईट वाटले. १५ संगणक वाहून गेले. यात २१ एसटी गाड्यांच्या टपापर्यंत पाणी येऊ लागले. त्यामुळे कार्यशाळेतील टायर, तसेच गाड्यांच्या वरच्या बाजूला आणि मागील बाजूला असलेले टायरही वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. माझा भ्रमणध्वनी आगाराबाहेर पडलेल्या एका कर्मचाऱ्याकडे राहिला. तर सोबत असलेल्या सहा कर्मचाऱ्यांपैकी एक दोघांचेच फोन लागत होते. त्यामुळे यंत्रणांशी संपर्क साधण्याचा  प्रयत्न करत होतो. तर दुसरीकडे प्रचंड पाऊस आणि वाढलेली पाण्याची पातळी पाहून धडकी भरत होती. अखेर रत्नागिरी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधूून त्यांना सगळी माहिती दिली. त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला आणि पोलीस बोटीच्या सहाय्याने पोहोचल्यानंतर त्यांनी दुपारी अडीचच्या सुमारास सुटका के ली. यामुळे आगाराचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.