मुंबई: कोकणातील गणेशभक्तांवरील विशेष प्रेमापोटी राज्याच्या अन्य भागांतील एसटी प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. मुंबई, ठाणे, पालघर भागातील कोकणवासियांच्या सेवेसाठी पाच हजार पेक्षा जास्त एसटी बस मागविण्यात आलेल्या आहेत. राज्याच्या इतर भागातील एसटी प्रवाशांच्यात असंतोषाची लाट पसरली आहे.
शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांनी तर २,९०० बस मोफत सोडल्या आहेत. यामुळे वाहतूक कोंडी आणि अन्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे.गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जात असतात. त्यासाठी वाहतूक सेवांचा वापर केला जातो. एसटीच्या गाडयांची समुह आरक्षण करण्याची प्रत्येक गावाची पध्दत आहे.
गणेशोत्सवावरील कोकणवासीयांचे प्रेम पाहता आता राजकीय मंडळीनी मोफत बस सेवा सुरु केली आहे. यात नगरसेवकापासून ते खासदारांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. यंदा एसटीच्या मुंबईतून दोन हजार, ठाण्यातून ३०९१, आणि पालघर मधून ६४५ बस अशा एकूण ५ हजार ७४१ बस सोडण्यात येणार आहेत. एसटीकडे सध्या १४ हजार धावणाऱ्या बस आहेत. त्यातील जवळपासून अर्ध्या बस कोकणासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून बस मुंबई महानगर प्रदेशात मागविण्यात आलेल्या आहेत.एका विभागासाठी हजारो बसगाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने एसटीच्या संसाधनांच्या समान वाटपाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून सुमारे २९०० मोफत बस कोकणासाठी सोडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
राज्यात कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणेच अनेक मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळे होत असतात. उत्तर महाराष्ट्रातील सप्तशृंगगडाची यात्रा, पंढरपूरची वारी, भीमाशंकर यात्रा यांसारख्या यात्रांच्या काळातही मोठ्या संख्येने भाविक प्रवास करतात. मात्र, कोकणासाठी करण्यात आलेल्या नियोजनाच्या तुलनेत अशा यात्रांसाठी हजारो एसटी बस एकाच वेळी उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. राजकीय सेवा वाढल्याने या बस आरक्षणाची संख्या वाढली आहे.
आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी महामंडळाच्या दृष्टीने मोफत बससेवेचा आर्थिक भार हा स्वतंत्र प्रश्न आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवातील विशेष वाहतुकीमुळे सुमारे आठ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.यंदा बसची संख्या वाढल्याने हा तोटा १२ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
याशिवाय गणेशोत्सवाच्या काळात ग्रुप बुकिंगच्या बसच्या परतीचा खर्च भरून काढण्यासाठी आकारण्यात येणारा २९ टक्के अधिभार रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात प्रवाशांना घेऊन गेलेल्या बस परतीच्या प्रवासात खाली येणार आहेत. त्या फेऱ्यांचा आर्थिक भारही महामंडळावरच पडणार आहे.
एसटीच्या पाच ते सहा हजार बसबरोबरच खासगी बस आणि मोठ्या संख्येने खासगी वाहने कोकणाकडे रवाना होणार असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा मोठा ताण पडणार आहे. आधीच काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या असताना गणेशोत्सवाच्या काळात वाहनांची संख्या वाढल्यास प्रवासाचा वेळ वाढण्याची शक्यता आहे. कोकणातील गणेशभक्तांवरील प्रेम कायम ठेवतानाच एसटीच्या प्रवाशांमध्ये प्रदेशनिहाय भेदभाव होणार नाही, याची काळजी घेणे आणि महामंडळाच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
कोकणात अशा प्रकारे एसटी बस सेवा देण्याची जुनी परंपरा आहे. ही सेवा पूर्ण करताना राज्यातील इतर भागातील सेवेवर परिणाम होणार नाही. याची काळजी घेतली जात आहे. एसटीच्या बस कोकणात जाऊन प्रवाशांना सोडून परत येणार असल्याने होणारा तोटा कमी करण्यासाठी जास्त दर आकारण्यात येणार होता पण तो रद्द करण्यात आला पण जास्त आसन क्षमता असलेल्या बस सोडून हा तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
