मुंबई : राज्यातील एसटी बस स्थानक परिसरात सुरू असलेल्या अवैध वाहतुकीला चाप बसविण्यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळ, पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली. १ ते २० जुलै २०२६ या कालावधीत ८,८३९ वाहनांवर कारवाई करून तब्बल १.६५ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.

एसटी बस स्थानके ही दररोज लाखो प्रवाशांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहेत. मात्र, बस स्थानक परिसरात होणाऱ्या अवैध वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी, अनिर्बंध वाहतुकीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबरोबरच मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर होती. या मोहिमेमुळे बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्थेत शिस्त निर्माण होण्यास मदत झाली असून प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि सुकर वातावरण उपलब्ध होत आहे. अवैध पार्किंगला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अशा संयुक्त मोहिमा यापुढेही अधिक प्रभावीपणे आणि सातत्याने राबविण्यात येणार आहेत.

बसस्थानक परिसरातील वाहतुकीची शिस्त आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन आपली वाहने केवळ अधिकृत वाहनतळांमध्येच उभी करावी आणि या जनहिताच्या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन एसटी महामंडळाने सर्व वाहनधारकांना केले आहे. ‘प्रवाशांची सुरक्षितता आणि बसस्थानक परिसरातील शिस्त हीच आमची प्राथमिकता’ या भूमिकेतून अवैध वाहतुकीविरोधातील ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात पुढेही सुरू राहणार असल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले.

या विशेष मोहिमेदरम्यान राज्यभरात एकूण ८ हजार ८३९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विविध यंत्रणांच्या संयुक्त कारवाईतून १ कोटी ६५ लाख २१ हजार ३१५ रुपये दंड वसूल करण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणारी १९५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

एसटी महामंडळ ही राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. एसटीच्या उत्पन्नावर परिणाम करणारी; तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी अवैध प्रवासी वाहतूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. बसस्थानक परिसरात अनधिकृत वाहतुकीमुळे निर्माण होणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचे प्रश्न लक्षात घेता या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.