मुंबई : एसटी महामंडळाने दिलेले आदेश धुडकावून उड्डाणपुलाजवळील किंवा त्याखालील बस थांबे टाळून थेट उड्डाणपुलावरून एसटी नेण्याचे प्रकार मुंबई महानगरात सर्रास घडत आहे. याबाबत महामंडळाकडे मोठय़ा संख्येने तक्रारी येऊ लागल्या असून या मार्गावर विशेष पथकामार्फत तपासणी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईही होईल, अशी माहिती एसटीतील अधिकाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत कुर्ला नेहरू नगर, मुंबई सेंट्रल, परळ आगार, नॅन्सी कॉलनी, ठाण्यातील वंदना, खोपट, ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील आगार, तसेच महानगरातील अन्य आगारांतूनही दर दिवशी मोठय़ा प्रमाणात शहराबाहेर बस जातात आणि शहरात प्रवेश करतात. मुंबई महानगरातील उड्डाणपुलाजवळच किंवा त्याखाली असलेल्या नियोजित बस थांब्यांवर एसटी न थांबताच काही चालक, वाहक थेट उड्डाणपुलावरूनच बस घेऊन जातात. त्यामुळे थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांना तासनतास बसची प्रतीक्षा करावी लागते. थांब्यांवर खोळंबलेले प्रवासी भ्रमणध्वनीवरून बस आगार किंवा बस स्थानकात, तसेच एसटीच्या हेल्पलाईनवर चौकशी करताच बस निघून बराच वेळ झाल्याचे किंवा नियोजित थांबा सोडून पुढे गेल्याचे समजते. त्यामुळे कुटुंबीयांसह आलेल्या प्रवाशांना याचा मनस्ताप होतो. शिवाय एसटीचेही उत्पन्न बुडते.

मुंबई महानगरातील दादर, मानखुर्द, वाशी हायवेजवळील उड्डाणपूल, सानपाडा, नेरुळ, कोकण भवन, खारघर, कामोठे, तसेच शीव येथील उड्डाणपुलावरून चालक एसटी घेऊन रवाना झाल्याच्या तक्रारी महामंडळाकडे येत आहेत. याची दखल महामंडळाकडून घेण्यात आली आहे. उड्डाणपुलाचा वापर न करता त्याखालील थांब्यांवर बस थांबवण्याचे निर्देश महामंडळाने यापूर्वीही दिले आहेत. मात्र, हे आदेश धुडकावणाऱ्या चालकांवर दंडात्मक, तसेच निलंबनाचीही कारवाईही करण्यात आली आहे. तरीही त्याकडे काही चालक दुर्लक्ष करतात आणि उड्डाणपुलावरून बस नेतात. उड्डाणपुलावरून एसटी घेऊन जाणाऱ्या आणि उत्पन्न बुडवणाऱ्या चालकांवर करडी नजर ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत. या मार्गावर पथकांमार्फत तपासणी करून संबंधित चालक आणि वाहकांवर कारवाई करण्याचे आदेश एसटी महामंडळाने विभाग नियंत्रकांना दिले आहेत. त्यानुसार चालक तसेच वाहकांच्या मूळ वेतनाच्या दहा टक्के दंड आकारण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus use flyover ignore passengers at stops zws
First published on: 14-05-2022 at 01:08 IST