मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान, पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण उचल व महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी केली. एसटी महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. महामंडळ आर्थिक अडचणींचा सामना करीत असतानाही कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद हिरावून घेता येणार नाही, अशी भूमिका सरनाईक यांनी यावेळी मांडली.
एसटीचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र मेहनत करून लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सेवा देतात. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून दिवाळीनिमित्त त्यांना सानुग्रह अनुदान देणे हे केवळ औदार्य नसून त्यांचा हक्क आहे. या निर्णयामुळे महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, हे आमचे आद्य कर्तव्य आहे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खंबीर पाठबळामुळे एसटी महामंडळाचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन वा संपाचे हत्यार उपसू नये, असे आवाहन त्यांनी केले. एसटी ही सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी आहे.
कोणत्याही आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये. कर्मचारी व प्रवासी हे एसटीचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवादातून मार्ग काढण्यास आम्ही सदैव तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असतानाच प्रवाशांना दर्जेदार सेवा देणे व एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, या दोन्ही उद्दिष्टांसाठी शासन आणि महामंडळ कटिबद्ध असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
