मुंबई : राज्य परिवहन (एसटी) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवर दिवाळीपूर्वी तोडगा न निघाल्याने महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये ३ नोव्हेंबरपासून घंटानाद आणि निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यानंतर ४ नोव्हेंबरला द्वारसभा, तर ५ नोव्हेंबरपासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे एसटी प्रशासनासमोर कर्मचारी मागण्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच, दिवाळीनिमित्त एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हे आहेत.

संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे आणि सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना १६ ऑक्टोबरला निवेदन देऊन मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली होती. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याचबरोबर २५ हजार रुपये दिवाळी भेट आणि १२ हजार ५०० रुपये सण उचल देण्याची मागणी करण्यात आली आहे.

वर्ष २०१६ पासूनची वार्षिक वेतनवाढ आणि घरभाडे भत्त्याची थकबाकी, २०१८ पासूनची महागाई भत्त्याची संपूर्ण थकबाकी अदा करावी; तसेच जानेवारी २०२६ पासून महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करावा, अशी मागणी आहे. याशिवाय निवडश्रेणी व श्रेणीकरणासंदर्भातील परिपत्रक रद्द करणे, निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित आर्थिक देणी देणे, गणवेश भत्ता, धुलाई भत्ता आणि स्थानिक पूरक भत्त्याची थकबाकी अदा करणे, अशा मागण्या केल्या आहेत.

घंटानाद आणि द्वारसभा

महामंडळाच्या जागा पीपीपी तत्त्वावर न देता स्वतः विकसित कराव्यात, ई-बसचे करार रद्द करून स्वमालकीच्या बस घ्याव्यात आणि कंत्राटी भरती थांबवावी, अशीही संघटनेची मागणी आहे. मुंबई सेंट्रल येथील संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी एक वाजता घंटानाद आणि द्वारसभा होईल, असे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.

आंदोलनाचे तीन टप्पे

१. दि. ३ नोव्हेंबर : राज्यभरातील सर्व आगारांमध्ये घंटानाद व तीव्र निदर्शने.

२. दि. ४ नोव्हेंबर : राज्यभर भव्य द्वारसभा व तीव्र निदर्शने.

३. दि. ५ नोव्हेंबरपासून : मागण्यांची पूर्तता होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन.