सुशांत मोरे

करोना साथीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाने एका सरकारी बँकेकडून २ हजार कोटी रुपये कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या कर्जासाठी आगार, स्थानकांबरोबरच एसटीच्या बसही तारण ठेवल्या जाणार आहेत.

मार्च महिन्यापासून प्रवाशांनी करोना साथीमुळे एसटी प्रवासाकडे पाठ फिरवली. २२ मार्चपासून टाळेबंदी सुरू होताच एसटीची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्याचा फटका बसून दिवसाचे २२ कोटी रुपये उत्पन्न मिळणे बंद झाले. कर्मचाऱ्यांच्या वेतनावर त्याचा परिणाम होऊन ते उशिराने मिळू लागले. एसटी महामंडळाला वेतनासाठी आतापर्यंत सरकारच्या निधीचीच मदत झाली. परंतु वेतनासह एसटीला अन्य खर्च भागवण्यासाठी मोठय़ा निधीची गरज असल्याने सरकारी बँकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात एका सरकारी बँकेकडून कर्ज घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दिवाळीआधी बँकेबरोबर याबाबत पुढील चर्चा करण्यात आली असून यात कर्जासाठी काही आगार, बस स्थानक तारण ठेवण्याची तयारी महामंडळाने दर्शवली. एसटीच्या आगारांचे मूल्य पाहून त्याप्रमाणे काही आगारांची यादीही देण्यात आली आहे. आगारांबरोबरच एसटी गाडय़ाही तारण ठेवण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

एसटीची मालमत्ता

* २५० आगार, ६०९ बस स्थानके आणि १८ हजार ६०० बस आहेत. यांचे स्थावर मूल्य काही हजार कोटी रुपये आहे.

* एसटी बसची एकूण किंमत ७०० कोटी रुपये आहे. सध्या महामंडळाकडे साध्या बसबरोबरच निमआराम, वातानुकूलित शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध या प्रकारातील बस आहेत.

* महामंडळाकडून तारण ठेवण्यात येणारे नेमके बसआगार व स्थानके, तसेच किती व कोणत्या प्रकारातील बसही तारण ठेवणार याची माहिती गुप्त ठेवली जात आहे.

* दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळाल्यास महिन्याला ४० कोटी रुपये हप्ता एसटी महामंडळ बँकेला देईल.

बँकेकडून दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी आगारांबरोबरच एसटी गाडय़ाही तारण म्हणून ठेवण्यात येतील. याविषयी अन्य माहिती देणे उचित नाही.

– शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ