एसटी महामंडळ आक्रमक; ५४२ कर्मचाऱ्यांचे निलंबन

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई बुधवारी आणखी तीव्र करण्यात आली असून ६४ आगारांतील ५४२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनप्रकरणी मंत्रालयात जात असताना बुधवारी अनेकांना ताब्यात घेण्यात आले. (छाया- गणेश शिर्सेकर)

५४२ कर्मचाऱ्यांचे निलंबन, खासगी बस, शालेय बसगाड्यांमधून वाहतूक

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी महामंडळाने कारवाईत वाढ के ली असून बुधवारी ५४२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे दोन दिवसांत निलंबित के लेल्या कर्मचाऱ्यांची एकू ण संख्या ९१८ झाली आहे. सांगली विभागातील जत, पलूस, इस्लामपूर, आटपाडी या आगारातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, राज्यातील एसटी सेवा ठप्प असल्याने महामंडळाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आरटीओ आणि पोलिसांच्या मदतीने आगारातून खासगी प्रवासी बसगाड्या, शालेय बस आणि अन्य खासगी वाहनांच्या माध्यमातून वाहतूक सुरू ठेवली.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई बुधवारी आणखी तीव्र करण्यात आली असून ६४ आगारांतील ५४२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. यामध्ये सांगली विभागातील इस्लामपूर आणि आटपाडी आगारातील ५८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नागपूर आणि यवतमाळ विभागातील विविध आगारांतील प्रत्येकी ४६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उचलण्यात आला. नाशिक विभागातीलही ४० कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे. अन्य विभागांतही विविध कारवाया झाल्याचे महामंडळाने सांगितले.

खासगी वाहने मदतीला

 प्रवाशांच्या सुविधेसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुणे, सोलापूर, पिंपरी चिंचवड, बारामती आणि अकलूज या भागात ४६५ खासगी बस, शालेय बस आणि अन्य वाहने चालवण्यात आली. त्यापाठोपाठ अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशिम या ४४१ खासगी वाहने चालवली. तर राज्यातील धुळे, नाशिक, कोल्हापूर यास अन्य विभागांतही खासगी वाहने चालवण्यात आली. सुमारे २ हजार १०२ पैकी ६३८ खासगी बस, तर १५९ शालेय बसची सेवा देताना उर्वरित अन्य वाहने असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली.

कर्मचारी पदपथावर

मुंबईतील परळ, मुंबई सेन्ट्रल, परळ आगारातील एसटीच्या चालक-वाहकांना मंगळवारी रात्री विश्रामकक्षातून पोलिसांच्या मदतीने बाहेर काढून कक्षांना कुलूप लावल्याचा प्रकार घडला. हीच कारवाई महानगरातील अन्य आगारांतही झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या साहित्यासह पदपथावरच रात्र काढावी लागल्याचे एका वाहकाने सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाप्रकरणी मंत्रालयात जात असताना माजी खासदार किरीट सोमय्या व आमदार गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याशिवाय मानखुर्द जकात नाक्याजवळ सदाभाऊ खोत यांनाही पोलिसांनी अडवले होते. या कारवाईला विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी ठिय्या आंदोलन  केले.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यांवर मानखुर्द जकातनाक्याजवळ सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: St corporation aggressive suspension of 542 employees private bus transportation by school buses akp

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या