मुंबई: प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ नवीन वर्षात १,२०० बस गाड्या दाखल करणार आहे. यातील काही बस स्वमालकीच्या तर काही बस भाडेतत्वावरील असतील. स्वमालकीच्या गाड्यांच्या बांधणीसाठी लागणाऱ्या सांगाड्याची निविदा प्रक्रि या राबविली जात असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात १६,५०० गाड्या असून यामध्ये साध्या बस, निमआराम, स्वमालकीच्या व भाडेतत्वावरील शिवशाही, शिवनेरी, अश्वामेध गाड्या आहेत. दरवर्षी महामंडळाच्या ताफ्यातून हजारो बसची कालमर्यादा संपल्याने त्या भंगारात काढल्या जातात. गेल्या दोन ते तीन वर्षात कालमर्यादा संपलेल्या बस भंगारात काढल्या गेल्या. परंतु निधीचा अभाव आणि करोना संकटामुळे ताफ्यात नवीन बस दाखल करता आल्या नाहीत. आता नवीन साध्या प्रकारातील बस घेण्याचा निर्णय झाला असून यात ७०० स्वमालकीच्या आणि ५०० भाडेतत्वावरील बस असतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सध्या ताफ्यात असलेल्या बसमध्ये साध्या बसची संख्याच अधिक आहे. मात्र साध्या प्रकारातील एकही भाडेतत्वावरील एसटी महामंडळाकडे नाही. नवीन येणाऱ्या बसगाड्यांमध्ये ५०० बस भाडेतत्वावर घेण्यात येतील. महामंडळाच्या राज्यातील सात विभागांकरीता घेण्यात येणाऱ्या या बस आठ वर्षाकरीता भाडेतत्वावर असतील. त्यावर चालक खासगी कंत्राटदाराचा व वाहक एसटीचा असेल. यासाठी निविदा प्रक्रि याही राबविली जात आहे. याव्यतिरिक्त एसटी महामंडळ स्वमालकीच्या ७०० साध्या बस घेणार असून त्याच्या चासीस खरेदीकरीता निविदा मागवण्यात आल्याचे सांगण्यात आले. साधारण ही सर्व प्रक्रि या राबवून बस ताफ्यात येण्यासाठी सात ते आठ महिने लागतील, अशी माहिती देण्यात आली.

११० मिडी बस भंगारात

अवैध वाहतुकीला शह देण्यासाठी एसटी महामंडळाने दहा वर्षांपूर्वी राज्याच्या शहरी तसेच काही ग्रामीण भागांतील प्रवाशांसाठी मिडी बस गाड्या आणल्या. अवैध प्रवासी वाहतुकीला आळा तर बसलाच नाही, मात्र मिडी बसच हद्दपार होऊ लागल्या. आयुर्मान संपत आल्याने व प्रतिसादही मिळत नसल्याने एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यातून ५९६ मिडी बस टप्प्याटप्यात काढण्यास सुरुवात केली. आता १५० बस ताफ्यात असून यातील ११० बस भंगारात काढल्या जाणार आहेत. उर्वरित बस काही महिन्यांकरिता प्रवाशांच्या सेवेसाठी असतील. त्याही बस ताफ्यातून लवकरच काढण्यात येणार आहेत.