मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने उत्पन्नवाढ, कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी एक सर्वसमावेशक ‘पंचसूत्री आराखडा’ तयार केला आहे. आगार पातळीपासून प्रादेशिक कार्यालयापर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी अधिक स्पष्ट करत, सुधारणांची कास धरत ‘वेग’ आणि ‘नियमितता’ या दोन चाकांवर एसटी महामंडळाला पुढे नेण्याचा निर्धार केला आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ते मुंबई येथे एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व खाते प्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक व विभाग नियंत्रक उपस्थित होते.

एसटी स्वतःला ‘चल संस्था’ म्हणून परिभाषित करते. दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या या व्यवस्थेचे मूल्यमापन आणि नियोजन दैनंदिन पातळीवर व्हावे, यासाठी सकाळी १० वाजता आगारात, ११ वाजता विभागात आणि १२ वाजता प्रादेशिक स्तरावर आढावा बैठक अनिवार्य केली. प्रवासी तक्रारी, रद्द फेऱ्या, नादुरुस्त वाहने, गैरहजर कर्मचारी या सर्वांची काटेकोर छाननी करून कार्यपद्धतीत तत्काळ सुधारणा करण्याचा मंत्र या बैठकींना दिला. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत आगार, विभाग व प्रदेशस्तरावर दुसऱ्या दिवशीच्या वाहतूक आराखड्याचे नियोजन केले जाईल. यात्रांपासून बाजारपेठांपर्यंत आणि शालेय सहलींपासून आकस्मिक गर्दीपर्यंत सर्व परिस्थितीसाठी आगार सज्ज राहणार आहे.

डिझेल एसटीच्या खर्चातील सर्वांत मोठा घटक आहे. त्यामुळे किमी प्रति १० लिटरनुसार चालकांना दररोजचे लक्ष्य दिले जाईल. किमी प्रति लिटर कमी असणाऱ्यांना समुपदेशन, प्रशिक्षण आणि गरजेनुसार प्रादेशिक स्तरावर उन्नत प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार, तिकीट विक्री ही महसुलाची जीवनवाहिनी असल्याने वाहकांना आगाराच्या दैनंदिन संचित प्रति किमी उत्पन्नाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उत्पन्न कमी असल्यास समुपदेशन, कर्तव्यात बदल किंवा तोंडी/लेखी समज सर्व पर्याय वापरले जातील. सातत्याने कमी उत्पन्न करणाऱ्या वाहकांवर विशेष लक्ष दिले जाईल.

आरक्षणास उपलब्ध बसची संख्या वाढवणे, भारमान ८० टक्क्यांपेक्षा कमी न ठेवणे, चांगले भारमान असणाऱ्या दिवशी जादा फेऱ्यांची उपलब्धता, प्रत्येक फेरीची देखरेख पर्यवेक्षकांच्या ‘दत्तक’ तत्त्वावर बस फेऱ्या देणे, अशा अनेक सुधारणा लांब-मध्यम पल्ल्याच्या व्यवस्थापनात करणे. यासोबतच ऑनलाइन व मोबाइल ॲपद्वारे आरक्षणाला मोठे प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

स्वच्छ, टापटीप बसस्थानके, प्रसाधनगृहांची दररोज किमान तीन वेळा तपासणी, उशिरा सुटणाऱ्या किंवा रद्द बस फेऱ्यांची प्रवाशांना योग्य माहिती, पर्यायी व्यवस्था आणि अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करणे आदी सुविधा केंद्रस्थानी ठेवणारी उपाययोजना राबवण्यात येणार आहे. एसटीच्या आर्थिक पुनरुत्थानाच्या दिशेने ही पंचसूत्री केवळ मार्गदर्शक तत्त्वे नाहीत, तर संपूर्ण व्यवस्था बदलण्याचा एक ठोस आराखडा आहे, असे मत सरनाईक यांनी व्यक्त केले.