मुंबई : बेस्ट उपक्रमाप्रमाणेच एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देता यावा यासाठी निवडणूक आयोगाला विनंती पत्र पाठवून साकडे घातले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली आहे. निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच तात्काळ कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
मागील वर्षी एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट दिवाळी बोनस म्हणून सहा हजार रुपये देण्यात आले होते. यावर्षीही कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा यासाठी विविध कर्मचारी संघटनांनी एसटी प्रशासन आणि शासनाला विनंती पत्र पाठविले होते. परंतु एसटी प्रशासनाच्या वित्त विभागाने वेळेत प्रस्ताव न दिल्याने शासनाकडून दिवाळी बोनसचा निधी एसटीला वितरित करणे शक्य झाले नाही. त्यामुळे एसटीचे ९० हजार कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याची आशा मावळली होती. मुळातच अत्यंत कमी पगार असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट महत्त्वाची होती. सर्वसामान्य जनतेची दिवाळी चांगली व्हावी, यासाठी घरचा सण सोडून ऐन दिवाळीत राबणाऱ्या चालक, वाहकांना बोनस न देणे हा त्यांच्यावरील अन्याय आहे, अशी भावना अनेक संघटनांनी व्यक्त केली होती.
हेही वाचा >>>मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघात तिरंगी लढत; मुस्लिम मते ठरणार निर्णायक
त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी करताना अडीअडणींना सामना करावा लागला. तसेच दिवाळीमधील खरेदीवर बंधने आली. दरम्यान बेस्टच्या ३० हजार कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी मुंबई महापालिकेने सुमारे ८० कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला अनुदान स्वरूपात दिले. ही रक्कम वितरित करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने निवडणूक आयोगाची परवानगी मागितली. निवडणूक आयोगाने दिलेल्या परवानगीच्या अधीन राहून बेस्ट उपक्रम कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतर का होईना, बोनस वितरित करणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनाही त्याच धर्तीवर बोनस देण्यात येईल. एसटी प्रशासनाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून बोनस वितरित करण्यासाठी परवानगी मागितली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.