मुंबईतील एसटी आगार बंदच

संपामुळे एसटी सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांसाठी आगारातून खासगी प्रवासी बस सेवा देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी प्रत्यक्षात मुंबईतील आगारांमध्ये मात्र ही सेवा सुरू नसल्याचे दिसत आहे.

परळ एसटी आगारातून खासगी बससेवा सुरू करण्यात आली नाही. आगारात एसटी बसगाडय़ा उभ्या होत्या, तर तुरळक कर्मचारी होते.

आंदोलनाच्या भीतीपोटी तीनही आगारांतून खासगी बससेवा देण्यास नकार

मुंबई : संपामुळे एसटी सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांसाठी आगारातून खासगी प्रवासी बस सेवा देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी प्रत्यक्षात मुंबईतील आगारांमध्ये मात्र ही सेवा सुरू नसल्याचे दिसत आहे. राज्यातील विविध आगारातून सेवा सुरू असतानाच आंदोलनकर्त्यांच्या भीतीपोटी मुंबईतील परळ, कुर्ला- नेहरूनगर आणि मुंबई सेन्ट्रल आगार बंद ठेवण्यात आले असून शहराबाहेर जाण्यासाठी प्रवाशांना मुंबईतील खासगी वाहतूक व्यावसायिकांवर अवलंबून राहावे लागले.

विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील एसटी सेवा पूर्णत: ठप्प आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य शासनाने सर्व खासगी प्रवासी बस, शालेय बस, कंपनीच्या मालकीच्या बस, मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्याची मुभा ९ नोव्हेंबरपासून दिली. त्यामुळे राज्यातील प्रत्येक आगारात ही वाहने उभी राहिली आणि एसटीच्या भाडेदराने सेवा देऊ लागले. मात्र मुंबईतील परळ, कुर्ला-नेहरूनगर आणि मुंबई सेन्ट्रल हे आगार बंदच ठेवले असून प्रवाशांसाठी एकही खासगी बस किं वा अन्य वाहन सुविधा देण्यात आलेली नाही.

कुर्ला-नेहरूनगर आगार, परळ आगारातील प्रवेशद्वारांवरच एसटी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले आहे. तीनही आगारांच्या प्रवेशद्वारांवर पोलीसही तैनात आहेत. मुंबईतील आझाद मैदानावरही एसटीचे कर्मचारी मोठय़ा प्रमाणात उपस्थित आहेत. त्यामुळे खासगी बसची सेवा देताना कोणतेही नुकसान होऊ नये या भीतिपोटी महामंडळाने तीनही आगारातून खासगी वाहतूक सुविधा बंद ठेवली आहे.  कुर्ला-नेहरूनगर आगारात काही प्रवासी बस सुरू होणार की नाही याची विचारणा करण्यासाठी येताच चेंबूर मैत्री पार्क येथून खासगी बस उपलब्ध असल्याची माहिती आगारातील कर्मचाऱ्यांकडून दिली जाते. रेल्वेगाडय़ांना असलेली प्रतीक्षा यादी आणि एसटीही उपलब्ध नसल्याने मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्यांचे हाल होत आहेत.

परिवहन विभागाची बघ्याची भूमिका

खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून मनमानी भाडे आकारणी केली जात असतानाही परिवहन विभागाने मात्र बघ्याची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांना विचारले असता, सणासुदीत एसटीच्या प्रति किलोमीटर भाडेदरापेक्षा ५० टक्के पेक्षा अधिक भाडे आकारणी करू नये, अशा खासगी वाहतूकदारांना सूचना आहेत. परंतु त्यापेक्षाही अधिक भाडे आकारणी होत असेल तर प्रवाशांनी आरटीओला कळवावे. त्यासाठी हेल्पलाइनही आहे. टोल फ्री क्र मांकही उपलब्ध असल्याचे सांगितले. अशा तक्रोरी दाखल होताच आरटीओकडून कारवाईही होते. या कारवाईसाठी विशेष मोहीमही घेतली जाते. सध्या राज्यात ज्या आगारातून खासगी वाहतुकीला परवानगी दिली आहे, तेथे आरटीओ व एसटी महामंडळाच्या देखरेखीखाली बसगाडय़ा सोडल्या जात असल्याचे सांगितले.

खासगी कं पन्यांकडून मनमानी दर आकारणी

आगार पूर्णपणे बंद ठेवल्याने मुंबईतील खासगी वाहतूकदारांचे फावले आहे. दादर टीटी, बोरिवलीसह मुंबईतील काही भागातून जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे यांसह राज्यातील अन्य शहरांत जाण्यासाठी खासगी बस वाहन कंपन्या मनमानी भाडे आकारत आहेत. मुंबई ते कोल्हापूर एसटीच्या शिवशाही वातानुकू लित बसचे भाडे ८४० रुपये, तर साध्या बसचे ५६५ रुपये आहे. मात्र खासगींकडून याच मार्गावर विना वातानुकू लित आसन प्रकारातील बसचे प्रत्येक माणशी ६०० रुपये भाडे आणि वातानुकूलित स्लीपरचे भाडे ९०० रुपयांपर्यंत आहे. जळगावला जाण्यासाठी वातानुकू लित स्लीपरचे भाडे ८०० ते १००० रुपयांपर्यंत असून एसटीचे याच मार्गावर साध्या बसचे भाडे ६३५ रुपये आहे.

पुण्यासाठी ४०० रुपये

मुंबई ते पुणे प्रवासासाठी दादर टी.टी. येथून चारचाकी वाहने सोडण्यात येत होती. त्यासाठी प्रत्येक प्रवाशामागे ३५० रुपये ते ४०० रुपये आकारणी करत होते. प्रवासी येताच त्यांना आपल्या वाहनात बसविण्यासाठी वाहनचालक, मालकांची चढाओढही होत होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: St depot mumbai closed ysh

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा