मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) चालक, वाहक आणि कर्मचारी यांनी कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करू नये, अशा वारंवार सूचना दिल्या गेल्या आहेत. कर्तव्यावरील मद्यपी कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. मात्र, तरीही कर्मचारी मद्यप्राशन करून, कर्तव्यावर जात असल्याचे निर्देशनास आले आहे. परळ आगारातील विश्रांतीगृहात मद्यप्राशन केलेला चालक आढळून आला. यावेळी त्याची तपासणी केली असता, मद्यप्राशन केल्याचे उघड झाले. त्यामुळे एसटीच्या सातारा आगारात कार्यरत असलेल्या चालकाचे निलंबन केले.
महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून एसटीची ओळख आहे. मात्र, एसटी कर्मचारी मद्यप्राशन करून कर्तव्य बजावण्याच्या घटना समाज माध्यमावर आल्याने एसटी महामंडळाची प्रतिमा डागाळली जाते. एसटी महामंडळाच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार वाहतूक नियंत्रण कक्षातील वाहतूक नियंत्रकाने कामगिरीवर जाणाऱ्या चालक, वाहकांनी मद्यप्राशन केले नसल्याची खात्री करणे आवश्यक आहे. काही आगारांकडून, विभागांकडून याबाबत सतर्कता दाखवली जात नाही. परिणामी, मद्यपान करून बस चालवण्याच्या घटना समोर येतात.
नुकतेच परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या परळ आगारात सदिच्छा भेट दिली. यावेळी सरनाईक यांनी चालक-वाहकाच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. सातारा आगारात कार्यरत असलेल्या चालकाची अल्कोहोल तपासणी मशीनद्वारे मद्यप्राशन तपासणी केली असता, चालकाने मद्यपान केल्याचे आढळले. तपासणी ठिकाणी दिलेल्या जबाबामध्ये चालकाने मद्यप्राशन केल्याचे मान्य केले. ही बाब गंभीर स्वरुपाची असून त्या चालकाला जबाबदार धरण्यात आले. या प्रकरणी चौकशीसाठी एसटी महामंडळाच्या सेवेतून चालकाला निलंबित केले. चालकाला निलंबितपणाच्या काळात रोज सकाळी १० वाजता सातारा आगारातील आगार व्यवस्थापक येथे हजेरी लावायची आहे, अशा सूचना चालकाला देण्यात आल्या आहेत.
एसटी महामंडळाचे चालक-वाहक बाहेरील आगारात कर्तव्य बजावितात. यावेळी त्यांच्या विश्रांतीसाठी विश्रांतीगृहांची उभारणी केली. या विश्रांतीगृहात उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाद्वारे, शासनाद्वारे अनेक प्रयत्न केले जातात. परंतु, चालक-वाहकाद्वारे मद्यपान करून, शिस्तभंगाचा प्रकार करतात. तसेच मद्यप्राशन करून कर्तव्यावर जात असल्याने, प्रवाशांच्या जीवाशी खेळ होतो. मद्यपान करून कर्तव्यावर जाणारा कर्मचारी केवळ अपघाताला निमंत्रण देत नाही, तर एसटीच्या सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासावरही प्रश्नचिन्ह निर्माण करतो. अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांना चौकशीअंती सेवेतून बडतर्फ केले पाहिजे, असा सूचना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत.
