मुंबई : एसटी महामंडळाच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देताना परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांना एक महिन्याची मुदत दिली आहे. या कालावधीत उत्पन्न वाढीसाठी ठोस परिणाम दिसून आले नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांवर बदली, पदावनती अथवा निलंबनासारखी कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. एसटीच्या दिवसाच्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या तोट्यात, महामंडळ आर्थिक संकटात या शीर्षकाखालील वृत्त लोकसत्ताच्या २८ जून रोजीच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेऊन परिवहन मंत्री सरनाईक यांनी तातडीने सोमवारी एसटीच्या उत्पन्न वाढीबाबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सरनाईक यांनी उपरोक्त इशारा दिला.

एसटीची भाडेवाढ होउनही नियोजनाच्या अभावामुळे एसटीचा तोटा वाढत आहे. ग्रामीण ,तालुकास्तरावर गाड्यांची मागणी जास्त असून दिवसा लांब पल्याच्या फेऱ्या चालविण्यात येत आहेत. दिवसाच्या लांब पल्याच्या गाड्यांना प्रवासी मिळत नाहीत. परिणामी महामंडळाचा महसूल बुडत आहे. एसटी ही केवळ वाहतूक सेवा नसून राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या मान्य करून दिलासा दिला आहे. त्यामुळे आता व्यवस्थापन आणि अधिकारी वर्गानेही आपल्या जबाबदारीचे भान ठेवून उत्पन्न वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. केवळ बैठका घेऊन किंवा कागदोपत्री नियोजन करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष परिणाम दिसला पाहिजे,असे मत परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केले.

यंदाच्या एप्रिल आणि मे महिन्यात, भाडेवाढ लागू असूनही एसटीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला. वर्षातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या या दोन महिन्यांतील ही घसरण गंभीर असून ती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही. राज्यातील ३१ पैकी २१ विभाग तोट्यात जाणे ही व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणारी बाब असल्याचेही सरनाईक यांनी नमूद केले.

विशेष तपास पथकाची नियुक्ती

महाव्यवस्थापक माहिती व तंत्रज्ञान यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती केली असून त्याद्वारे महामंडळातील आर्थिक अफरातफर अथवा अनियमिततेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

अधिकाऱ्यांचे मूल्यमापन प्रत्येक आगार, विभाग, प्रादेशिक कार्यालय आणि मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे स्वतंत्र मूल्यमापन केले जाणार आहे. प्रवासी वाढ, उत्पन्नवाढ, फेऱ्यांचे नियोजन, खर्च नियंत्रण, बसचा कार्यक्षम वापर आणि स्थानिक स्तरावरील नाविन्यपूर्ण उपक्रम या सर्व बाबींचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.

एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अधिकारी वर्गाने आता निकाल देण्याची वेळ आली आहे. काम करणाऱ्यांना संपूर्ण पाठबळ मिळेल. मात्र अकार्यक्षमता, उदासीनता आणि निष्क्रियता खपवून घेतली जाणार नाही. एक महिन्यानंतर कामगिरीच्या आधारे निर्णय घेतले जातील. आवश्यक असल्यास बदली, पदावनती किंवा निलंबनासारखी कठोर कारवाई करण्यात येईल.- प्रताप सरनाईक ,परिवहन मंत्री.