मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने राज्यभर अत्याधुनिक स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मुंबईतील परळ बस स्थानकात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेमुळे राज्यातील बस स्थानके, एसटी बस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे अधिक स्वच्छ, सुंदर आणि प्रवासी-अनुकूल बनविण्याचा महामंडळाचा संकल्प असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

परळ बस स्थानकात आयोजित कार्यक्रमात स्वच्छता मोहिमेसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक यंत्रसामग्रीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील प्रमुख बस स्थानके आणि परिसर अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने नियमित स्वच्छ करण्यात येणार आहेत. तसेच एसटी बस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे यांची दर चार तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

एसटी ही महाराष्ट्राच्या जनजीवनाचा अविभाज्य भाग आहे. दररोज लाखो प्रवासी एसटीच्या सेवांचा लाभ घेतात. त्यामुळे प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही महामंडळाची प्राथमिक जबाबदारी आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेली ही राज्यव्यापी स्वच्छता मोहीम प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि समाधानकारक बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

प्लास्टिक संकलन आणि पुनर्वापरावर भर

या उपक्रमांतर्गत प्रत्येक बस स्थानकावर स्वच्छता मोहिमेदरम्यान आढळणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या व पिशव्या संकलित करून त्या पुनर्वापरासाठी (रिसायकलिंग) पाठविण्यात येणार आहेत. या प्रक्रियेतून विविध टिकाऊ आणि उपयुक्त उत्पादने तयार केली जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

स्वच्छता ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून सातत्याने राबविण्याची प्रक्रिया आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत नियमित देखरेख ठेवली जाणार आहे. प्रत्येक बसस्थानकावरील स्वच्छतेचे नियोजनबद्ध निरीक्षण करण्यात येईल. तसेच प्रवाशांकडून मिळणाऱ्या सूचना आणि अभिप्रायांनाही प्राधान्य दिले जाईल.

ई-बससाठी विस्तारित चार्जिंग केंद्रांचे भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी महामंडळाने राज्यातील सर्व २५१ आगारांमध्ये ई-बससाठी चार्जिंग स्थानकाचे जाळे उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित नऊ चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचे भूमिपूजन प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर सरनाईक यांनी परळ बसस्थानक परिसर, प्रवासी प्रतीक्षागृह, प्रसाधनगृहे आणि इतर सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

राज्यभर एकाच वेळी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे एसटी स्थानकांच्या स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा होऊन प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.