एसटी प्रवासात तिकीट न काढल्यास थेट शेवटच्या थांब्यापर्यंत फरफट
एसटीचा फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याचा विचार महामंडळाकडून केला जात आहे. यात येत्या काळात एसटीचे तिकीट न काढल्यास संबंधित प्रवाशाला थेट शेवटच्या थांब्यापर्यंत नेले जाणार असून त्यानंतर त्याचा जबाब नोंदवून त्याची सुटका केली जाणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. एसटीच्या ६८व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सध्या प्रवाशाने एसटीचे तिकीट न काढल्यास वाहकाची चौकशी केली जाते. या चौकशीच्या फेऱ्यात वाहक वर्षांनुवर्षे अडकून बसतो. बरेचदा निलंबित होतो. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट न काढल्यास थेट प्रवाशांवरच कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
तसेच प्रवाशांना आकर्षति करण्यासाठी महामंडळाने शाळांच्या व इतर सहलींसाठी विशेष ‘सहल’ आणि लग्नाच्या वऱ्हाडासाठी ‘शुभमंगल’ नावाच्या बस गाडय़ांची घोषणा केली आहे.
सुरुवातीला अशा पाच बस गाडय़ा प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्यात येणार असून एसटीचे तिकीट लवकरच घरपोच देण्याच्या योजनेवरही काम सुरू असल्याचे रावते यांनी सांगितले.
या गाडीत ध्वनिक्षेपक आणि आसनांमध्ये मोकळी जागाही तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचा गौरव
या कार्यक्रमात स्नेहलता राज्याध्यक्ष, दिलीप सुर्वे, अक्षता दरेकर, दिलीप विघ्ने, एल.व्ही.नार्वेकर, आर.ए.पावटे, सुरेश भुजबळ, शशिकांत भोसले, सीताराम परब, रेखा नारकर, अशोक िशदे, दिलीप लाड या सेवा ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना मानपत्र आणि पाच हजार रुपयांची एफडी गुंतवणूक प्रमाणपत्र भेट म्हणून देण्यात आले.