लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे राज्यातील २५१ आगारापैकी ३५ आगारे पूर्णतः बंद झाली आहेत. तर, इतर भागातील एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे. गणेशोत्सवानिमित्ताने गावी जाण्याच्या तयारीत असलेल्या नागरिकांचा यामुळे हिरमोड होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एसटी संघटनांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे.
वेतनाशी निगडीत आर्थिक व महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यात येत नसल्यामुळे एसटी कामगारांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळातील बहुतांशी संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन केली. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याबरोबरच मागील वेतन वाढीतील फरक दूर करावा, महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम द्यावी, मागील करारातील त्रुटी दूर करावी, याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल, सर्व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कॅशलेस योजना लागू करावी आदी प्रलंबित मागण्यांसाठी कृती समितीने आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार राज्यातील विविध आगारांमध्ये काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.
राज्यातील ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन पुकारल्याने ३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ पर्यंत २५१ आगारांपैकी ३५ आगार पूर्णतः बंद आहेत. इतर आगारांमध्ये अंशतः किंवा पूर्णतः काम सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच राहिले तर गणेशोत्सव काळात राज्यभरातील गणेश भक्तांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळू नये यासाठी मंगळवारी दुपारी १२ वाजता मंत्रालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एसटी कामगार कृती समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले आहे. तर, बुधवारी सायंकाळी ७ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगार संघटनांच्या कृती समितीला त्यांच्या मागण्यांबाबत बैठकीस बोलावले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे. त्यामुळे येथील वाहतूक खंडित झालेली नाही. परंतु, ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पूर्णतः बंद आहेत. विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे. तेथे बंदचा प्रभाव दिसून आलेला नाही. तथापि, मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत.
आणखी वाचा-कीर्तिकरांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी वायकर यांना मुदतवाढ
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस हे आगार पूर्णतः बंद आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत.
नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव ,पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे.